मुंबई - राज्यात कोरोना विषाणू (कोविड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी जेथे अधिक बसेस सोडण्याची आवश्यकता आहे तेथे त्यानुसार त्वरित कार्यवाही करुन प्रवाशांची संभाव्य गैरसोय दूर करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत. परंतु खाजगी बसेसकडून जर अधिकचे प्रवास भाडे घेण्यात येत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.
परब म्हणाले, अत्यावश्यक सेवा वगळता खबरदारी ची उपाययोजना म्हणून काही खासगी कंपन्यानी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी,प्रवाशी गावी जात आहेत. या काळात खासगी बस सेवांनी अधिकचे प्रवास भाडे घेतल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खासगी बससेवांनी सामाजिक बांधीलकीतुन योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करून सहकार्य करावे असेही परब यांनी यावेळी संगितले.
परब म्हणाले, राज्यातील प्रमुख शहरातील गर्दीच्या बसस्थानकावरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझरचा योग्य वापर करून स्वच्छ केली जावी. तसेच बस स्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना, सँनिटरी लिक्विड एक बाटली देण्यात यावी, प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी. याबरोबरच आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस सॅनिटरी लिक्विड मिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी. तसेच बसस्थानकावरील उद्घघोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी करोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. अशा प्रकारे एसटी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. प्रवाशांनीही काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये, असे आवाहन परब यांनी केले आहे.