गोराईच्या भीमनगर येथील नाल्यावरील उर्वरित झोपड्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:37+5:302021-06-25T04:06:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरिवली पश्चिम गोराईच्या भीमनगर येथील नाल्यावर भरणी करून ६० ते ७० अनधिकृत झोपड्या बांधल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरिवली पश्चिम गोराईच्या भीमनगर येथील नाल्यावर भरणी करून ६० ते ७० अनधिकृत झोपड्या बांधल्या आहेत. उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्या सूचनेनुसार भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा निवळे व नगरसेविका अंजली खेडकर यांनी येथे स्टिंग ऑपरेशन व फेसबुक लाईव्ह केले. त्यांनी पाहणी केली असता ६० ते ७० अनधिकृत झोपड्यांचे पक्के बांधकाम करून झोपडपट्टी दादा त्या झोपड्या विकत आहेत असे निदर्शनास आले.
लोकमतने या संदर्भात सविस्तर वृत्त दिले होते. लोकमतच्या वृत्तानंतर आर मध्य वॉर्डच्या सहायक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी बोरिवली पोलिसांच्या मदतीने येथील ११ झोपड्यांवर धडक करवाई केली. आता उर्वरित झोपड्यांवर कारवाई करून नाला रुंदीकरण करावे, अशी मागणी रेश्मा निवळे यांनी डॉ. भाग्यश्री कापसे यांच्याकडे केली आहे. यावर कारवाई न झाल्यास भविष्यात मालवणीसारखी दुर्घटना येथे घडू शकते त्यामुळे या सरकारी जमिनी ताब्यात घेऊन त्यावर सरकारी प्रकल्प राबवावावेत व भीमनगर नाला रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, असे निवेदन निवळे यांनी सहायक आयुक्तांना दिले आहे.
आमदार सुनील राणे यांनी सदर बांधकाम निष्कासित करण्याची मागणी लावून धरल्याने पालिकेने कारवाई केली. परंतु अजूनही अनधिकृत झोपड्या तिथे असून उर्वरित झोपड्यांवर पालिकेने कारवाई केलीच पाहिजे व संबंधित झोपडपट्टी दादांवर एमआरटीपी दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
याप्रकरणी डॉ. भाग्यश्री कापसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,सदर झोपड्या या सरकारी जागेवर उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे सदर झोपड्या या उपनगर जिल्हाधिकारी यांच्या अख्यारितीत येत असून पालिकेने या झोपड्यांवर दोनदा कारवाई केली आहे. या झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी आपण उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------------