मी राष्ट्रवादीच्या नेत्याला आव्हान देतो, आपण राहुल गांधींकडून वदवून घ्या की, ते आयुष्यात कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाहीत. आता त्यांनी निवडणुका आहेत, म्हणून गप्प केले आहे. टाळे ठोकले आहे त्यांना. पण एकदा तरी त्यांच्याकडून असे वदवून घ्या, असे आव्हाहन देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवारांवर हल्ला चढवला. एवढेच नाही तर, ते (शरद पवार) असे करू शकत नाही. कारण त्यांना माहीत आहे, निवडणूक संपल्यानंतर ते पुन्हा सावरकरांना शिव्या द्यायला सुरुवात करणार आहेत. असेही मोदी म्हणाले. ते शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या सभेला संबोधित करत होते.
"मुंबई चैत्यभूमीपासून प्रेरणा घेते, हे देखील आमचेच सरकार आहे, ज्याने देश व जगभरात डॉ. बाबासाहेबांचे पंचतिर्थ विकसित केले आहेत," असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, "बंधूंनो, शिवतिर्थच्या या भूमीत कधीकाळी बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावकरांचा आवाज घुमला होता. मात्र, आज विश्वासघाती आघाडीला पाहून, त्यांच्या आत्म्याला किती दु:ख होत असेल. या नकली शिवसेनावाल्यांनी बाळासाहेबांना धोका दिला. यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला, सत्तेसाठी हे राम मंदिराला शिव्या देण्याऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी हे मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले. जी काँग्रेस दिवस-रात्र वीर सावरकरांना शिव्या देते आज त्यांच्या कुशीत बसले आहेत," असे म्हणत पंतप्रधान मोदींनी नाव न घेता, उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.