विनाआरक्षित रेल्वे तिकीट काढा थेट मोबाइलवरून!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:42 AM2018-11-03T04:42:24+5:302018-11-03T07:04:50+5:30
रेल्वेची प्रवाशांना दिवाळी भेट; ‘यूटीएस अॅप’मधून घेता येईल सुविधेचा लाभ
मुंबई : तिकीट खिडक्यांवरील रांगेत त्रस्त न होता कोणत्याही विनाआरक्षित मेल-एक्स्प्रेसचे तिकीट आता थेट मोबाइलवरून काढता येणार आहे. रेल्वे सूचना प्रणाली केंद्राची निर्मिती असलेल्या ‘यूटीएस अॅप’मधून या सुविधेचा लाभ घेता येईल. प्रवाशांना रेल्वेने दिलेली ही दिवाळी भेटच म्हणता येईल.
यापूर्वी यूटीएस अॅपमधून केवळ उपनगरीय रेल्वे तिकीट काढले जात होते. आता हे अॅप ‘अपडेट’ केल्याने देशभरातील सर्व रेल्वे झोनमधील विनाआरक्षित मेल-एक्स्प्रेसचे तिकीट बुक करता येणार आहे. गुरुवारपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना
अॅप अपडेट करून या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे रेल्वे सूचना प्रणाली केंद्राचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले.
तिकीट रद्द करण्याचीही सुविधा
साधे तिकीट, फलाट तिकीट, सीझन तिकीट बुक करण्यासह तिकीट रद्द करण्याचीदेखील सुविधा अॅपमध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आर वॉलेटच्या रिचार्जवर ५ टक्के बोनस देण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रांगेतून होणार सुटका : सद्य:स्थितीत ५० लाखांहून अधिक डाउनलोड झालेले भारतीय रेल्वेचे यूटीएस हे अधिकृत मोबाइल अॅप आहे. जीपीआरएस असलेल्या स्मार्टफोनमध्ये हे मोबाइल अॅप वापरता येते. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यूटीएस मोबाइल अॅपमधून मेल-एक्स्प्रेसच्या विनारक्षित तिकिटांची सुविधा सुरू केल्यामुळे प्रवाशांची रांगेतून सुटका होणार आहे.