Join us

तेरणाचा भूखंड परत घ्या!

By admin | Published: July 03, 2015 1:13 AM

सिडकोने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला शैक्षणिक कार्यासाठी दिलेल्या भूखंडाचा १२ वर्षांत वापर करण्यात आलेला नाही. भूखंड घेताना केलेल्या कराराचे संबंधितांनी उल्लंघन केले

नवी मुंबई : सिडकोने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला शैक्षणिक कार्यासाठी दिलेल्या भूखंडाचा १२ वर्षांत वापर करण्यात आलेला नाही. भूखंड घेताना केलेल्या कराराचे संबंधितांनी उल्लंघन केले असल्यामुळे त्यांचा भूखंड परत घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शहरात शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी सिडकोने सवलतीच्या दरामध्ये भूखंड वितरित केले आहेत. भूखंड देताना संबंधित संस्थेने सहा महिन्यांमध्ये बांधकाम करणे आवश्यक असते. तेरणा चॅरिटेबल ट्रस्टला आॅक्टोबर २००२ मध्ये सेक्टर २२ मध्ये भूखंड देण्यात आला आहे. बालाजी मंदिर टेकडीला लागून हा भूखंड आहे. संबंधित संस्थेने २००३ मध्ये सिडकोशी करार केला आहे. करारामध्ये सहा महिन्यांमध्ये बांधकाम सुरू करणे आवश्यक होते. दीड वर्षात बांधकाम पूर्ण करावे किंवा वाढीव मुदत घ्यावी, अशी अट होती. परंतु भूखंड घेऊन जवळपास १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही स्थिती जैसे थे आहे. फक्त तेरणा ट्रस्टचा गंजलेला फलकच दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी याविषयी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांना निवेदन दिले आहे. भूखंडाचा वापर करण्यात आला नसल्यामुळे तो परत घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. योग्य कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.