मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र वगळून इतर सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा ९ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयाेजित करण्याच्या सूचना संलग्नित महाविद्यालयांना दिल्या हाेत्या. आता पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या बॅकलॉगच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपर्यंत घेऊन निकाल जाहीर करावेत. ज्या परीक्षांचे निकाल विद्यापीठातर्फे जाहीर केले जातात अशा परीक्षांच्या नोंदी विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीत अपलोड कराव्यात, अशा सूचना संलग्नित महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिल्या आहेत.२३ मार्चपूर्वी ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत त्यांनी त्या पुन्हा घेऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या १८ मे २०२० च्या परिपत्रकानुसार, अंतिम सत्र वगळून इतर वर्षातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ग्रेडिंग पद्धतीनुसार (५० टक्के अंतर्गत गुण व ५० टक्के मागील सत्रातील गुण) करून निकाल जाहीर करावा व त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा. यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालये सुरू झाल्यावर १२० दिवसांच्या आत घ्यावी. त्यानुसार विद्यापीठांतर्गत संलग्नित महाविद्यालयांच्या नियमित विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील यांनी दिली.बॅकलॉगच्या एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी कार्यप्रणाली जाहीर करण्यात येऊन त्याही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आता त्या परीक्षा ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून निकाल जाहीर करण्याच्या सूचना महाविद्यालयांना मंगळवारी दिल्या आहेत. यामुळे पुढील सत्रांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठीची आखणी करण्यात विद्यापीठाला मदत होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
बॅकलॉगच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपर्यंत घ्या, निकाल जाहीर करा : विद्यापीठाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 1:57 AM