बेस्ट भाडेवाढ मागे घ्या!
By admin | Published: February 2, 2015 02:54 AM2015-02-02T02:54:49+5:302015-02-02T02:54:49+5:30
बेस्ट परिवहन सेवेच्या प्रवासी भाड्यात झालेली दरवाढ अन्यायकारक असून, ती तत्काळ मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे
मुंबई : बेस्ट परिवहन सेवेच्या प्रवासी भाड्यात झालेली दरवाढ अन्यायकारक असून, ती तत्काळ मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे.
डिझेलचे दर कमी झाले असताना बेस्टने केलेली भाडेवाढ संतापजनक असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. गरिबांच्या खिशातून १०-१० रुपये लुटून ते १० लाखांच्या सुटासाठी उधळाल तर जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ६० टक्क्यांहून अधिक कमी झाल्या आहेत. मात्र सरकारने त्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. लोकांना दाखवायला म्हणून पेट्रोलियम पदार्थांचे दर किरकोळ प्रमाणात कमी केले; परंतु त्यावरील उत्पादन शुल्क वाढवून ग्राहकांच्या खिशातून पुन्हा ज्यादा पैसे काढून घेतले.
आता बेस्टच्या प्रवासी भाड्यात वाढ करून आणखी लूट सुरू झाली आहे. खरेतर आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे डिझेलचे भाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे बेस्टने भाडेकपात करायला हवी होती. मात्र त्याऐवजी १ रुपयापासून १० रुपयांपर्यंत मोठी भाडेवाढ झाल्याने सामान्य नागरिकांवरील आर्थिक बोजा वाढला आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांत जनतेला स्वस्ताईचे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)