सलग सुट्ट्यांमुळे वाहतूककोंडी, अंदाज घेऊनच पडा बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:52 AM2018-04-29T06:52:47+5:302018-04-29T06:53:07+5:30
सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची अभूतपूर्व कोंडी झाली.
लोणावळा : सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची अभूतपूर्व कोंडी झाली. या कोंडीत सापडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. वाहनांच्या रांगा लागल्याने वाहने लोणावळ्यातून सोडण्यात आली. त्यामुळे लोणावळा व खंडाळा गावातही प्रचंड वाहतूककोंडी झाली.
वाहतूककोंडीची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी केलेल्या नियोजनाचा बोऱ्या वाजला आणि पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच अमृतांजन पुलाच्या चढणीवर काही अवजड वाहने बंद पडल्याने वाहतूक अगोदरच मंदावली.
पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूरबरोबरच कोकणात जाणाºयांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गही जाम झाला. माणगावपाशी पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. उन्हाळा असल्याने कोकणात जाणाºयांची संख्या कमी असेल, असा अंदाज होता. मात्र, तो खोटा ठरला. उन्हाळ्यात सुट्टीची मजा लुटण्यासाठी व आंबे खाण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे.
अंदाज घेऊ नच पडा बाहेर
पुढील दोन-तीन दिवस लोणावळ्यात, तसेच द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता असल्याने शक्यतो पर्यटकांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे. तसेच ज्या पर्यटनस्थळांवर जाणार आहे त्या ठिकाणच्या रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज घेतच प्रवास करावा.