मुंबईतील हवेत गारवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यानंतर मुंबईवर आलेले पावसाचे काळेकुट्ट ढग आता विरले आहेत. परिणामी मागील पाच दिवसांपासून मुंबईत सुरू असलेला हिवाळ्यातल्या पावसाने विसावा घेतला आहे.
मुंबईत मंगळवारी बहुतांश ठिकाणी स्वच्छ मोकळे आकाश होते. शिवाय मळभ हटल्याने दाखल झालेल्या सूर्यप्रकाशामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. हवामानात झालेल्या बदलांमुळे मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार नाेंदवण्यात आले. विशेषत: कमाल तापमान थेट २७ अंशांवर घसरले होते, तर दुसरीकडे किमान तापमान स्थिर होते. कमाल तापमानातील घसरणीमुळे मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला.
दरम्यान, रविवारी रात्री दीडच्या सुमारास दक्षिण मुंबईसह मुंबईच्या उपनगरात पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या हाेत्या. सोमवारी सकाळी उपनगरात बहुतांश ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली हाेती. मंगळवारी मात्र संपूर्ण मुंबईतून पावसाने माघार घेतली.
* वातावरणात आढळले धुलिकण
मुंबईवरील मळभ हटले असले आणि पाऊस थांबला असला तरी मंगळवारी मुंबईत ठिकठिकाणी धूर, धूळ, धुलिकण मोठ्या प्रमाणात वातावरणात आढळून आले. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर दृश्यमानता कमी झाल्याचे चित्र होते. संपूर्ण मुंबईतही कमी-अधिक फरकाने हीच स्थिती होती.
.............................