Join us  

मार्गदर्शक फलकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Published: October 12, 2014 11:25 PM

बोईसरहून तारापूर एमआयडीसीमध्ये जाणा-या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका येथे एमआयडीसीचा मोठा मार्गदर्शक फलक आहे

बोईसर: बोईसरहून तारापूर एमआयडीसीमध्ये जाणा-या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका येथे एमआयडीसीचा मोठा मार्गदर्शक फलक आहे. परंतु दुर्दैवाने त्या फलकावर बाराही महिने अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावले जात असल्याने तो फलक नावापुरताच आहे. परंतु निवडणक आचारसंहितेच्या बडग्यामुळे ग्रामपंचायतने अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे धैर्य दाखविल्यामुळे सध्या हा फलक मोकळा श्वास घेत असून नव्याने येणाऱ्यांना तसेच वाहनचालकांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे.सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज, बॅनर्स, फलक व त्यामुळे होत असलेले शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने १ सप्टेंबर २०१४ रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्याचबरोबर आचारसंहितेमुळे बोईसर ग्रा.पं.च्या वतीने विविध प्रकारचे सुमारे दोनशे होर्डिंग्ज जमिनीवर आहेत. गृह विभागाचे परिपत्रक आणि आचारसंहिता या दोन्हीमुळे एरवी संपूर्ण बोईसरभर दिसणारे राजकीय व व्यवसायिक होर्डिंग्जवर बडगा उचलल्याने शहर होर्डिंग्ज मुक्त दिसत असल्याने सध्या रस्ते सुटसुटीत वाटत आहेत.बोईसर ग्रामपंचायत हद्दित अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात येऊ नये म्हणून ग्रामसभेतही अनेक वेळा ठरावाद्वारे मागणी होत होती तर अनेक वेळा ग्रामपंचायत व पोलिसांनी संयुक्तपणे होर्डिंग्ज काढून टाकण्याची कार्यवाही केली होती. परंतु शहरभर येरे माझ्या मागल्या अशी परिस्थितीमुळे बोईसर सतत बॅनरयुक्तच दिसत होते. (वार्ताहर)