आराेग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत; दररोज प्या ८ ते १० ग्लास पाणी, पाैष्टिक आहार, फळांचा रस उपयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्च महिना सरत असतानाच कमाल तापमानात वाढ होते आहे. तापमानाचा पारा ३८ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. कोकणला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने उन्हाच्या आणखी झळा बसणार आहेत. उन्हाळ्यात शरीराच्या तापमानात अचानक वाढ होत असल्याने आजार होऊ शकतात. उन्हामुळे स्ट्रोकचा धोका सर्वांधिक असतो. परिणामी अशा वेळी आरोग्याची अधिकाधिक काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले.
डॉ. मनीषा भट्ट यांनी सांगितले की, उन्हाळ्यात वातावरणातील तापमानात वाढ होत असल्याने कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. यामुळे अनेक उन्हाळी आजारांचाही सामना करावा लागतो. उष्णतेमुळे शरीरातून घाम निघत असल्याने बऱ्याचदा अनेकांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यासाठी उष्माघात, ताप, कांजण्या, कावीळ, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, यांसारखे त्रासही होतात. याशिवाय उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जसे की, त्वचा लाल पडणे, जळजळ होणे आणि त्वचा कोरडी पडणे अशी समस्या उद्भवू शकते. पायात अधिक तास शूज घालून राहिल्याने पायाला संसर्ग होण्याचा धोका असतो.
डॉ. छाया वाजा म्हणाल्या की, उन्हाळ्यात शरीराच्या तापमानात अचानक वाढ होत असल्याने विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. कडक उन्हामुळे स्ट्रोकचा धोका सर्वांधिक असतो. अशा वेळी रुग्णाला दाखल करून उपचार करावे लागतात. काहींना चक्कर येणे किंवा वारंवार उलट्या होणे असा त्रासही होऊ शकतो. लहान मुलांना आणि पन्नाशीच्या पुढील व्यक्तींना उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. नारळाचे पाणी, केळी, फळांचा रस, इलेक्ट्राॅल पावडर आणि पौष्टिक आहार घ्यावा. जंकफूड, दारू, मसालेदार खाद्यपदार्थ खाणे टाळावे. त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* हे करा...
- दररोज दोनदा आंघोळ करा. हलका आहार घ्या. थंडपेय प्या. फळभाज्यांचा आहारात समावेश करा. शरीराला थंडावा मिळेल, असे पदार्थ खा. तेलकट, मसालेदार आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा. उन्हात डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी घराबाहेर पडताना सनग्लासेस वापरा. घामोळे हाेऊ नये, यासाठी टाल्कम पावडर वापरा.