Join us

कोरोनानंतर आता डेंग्यू, मलेरियाची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. मात्र तरीही वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविलेला तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ...

मुंबई : मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. मात्र तरीही वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविलेला तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. परंतु, आता तिसऱ्या लाटेपूर्वी पावसाळ्यातील साथींच्या आजारांविषयी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले होते. २०२० साली मलेरियाच्या ३ हजार ९९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी होती. यंदाही पालिका प्रशासनाने साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. शिवाय, कोणालाही हिवतापाची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. घरातील अथवा घराजवळच्या साठलेल्या पाण्यातून होणाऱ्या डासांद्वारे साथरोग होतात. साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होते. त्यातून अनेक डासांची निर्मिती होते. डास चावल्याने त्यामुळे थंडी वाजून येणे, ताप येणे, अंग दुखणे आणि काही वेळा शरीरातील रक्तपेशी कमी होऊन रक्तदाब कमी-जास्त होणे अशी लक्षणे दिसून येतात. असे आजार वाढल्यास त्वरित उपचार करणे गरजेचे असते. आजार टाळण्यासाठी वेळेवर झोप, सकस आहार, नियमित व्यायाम यांची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०१९ साली मलेरियाच्या संसर्गात २०१८ च्या तुलनेत १८ टक्क्यांनी घट झाली होती. तर २००० सालच्या तुलनेत २०१९ मध्ये ८३ टक्क्यांनी प्रमाण कमी झाले. शिवाय, दरम्यान या काळात मृत्यूंमध्येही ९२ टक्क्यांनी घट झालेली दिसून आली आहे.

ही घ्या काळजी

- पावसाळ्यात थंड पदार्थ खाणे किंवा थंड हवेत फिरायला जाण्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार बळावतात. यासाठी गरम पाणी पिणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे हितावह आहे.

- पावसाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करू नये. त्याऐवजी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करावा.

- खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाकावर रुमाल धरावा. नाकातील स्रावातून निघणारे विषाणू हवेत पसरतात आणि त्यामुळे आजाराचा संसर्ग वाढतो. सर्दी किंवा खोकला झालेल्या रुग्णाचा हातरुमाल कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरू नये.

- डासांपासून बचाव करण्यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणे.

- सर्दी, खोकला या आजारांचा संसर्ग होऊ नये, यासाठी वारंवार हात धुणे गरजेचे.

- दम्याच्या रुग्णांनी कमी तापमानात जाणे टाळावे. घराबाहेर पडल्यावर नाकावर रुमाल किंवा स्कार्फ बांधावा.

- संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. पथ्य पाळावे. नियमितपणे सांध्यांना तेल लावून मसाज केल्याने फायदा होईल.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवणे तसेच या काळात अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.