राज्यातील हिरकणी कक्षाची देखभाल करा, एसटीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 05:11 AM2018-08-10T05:11:27+5:302018-08-10T05:12:56+5:30
नवजात शिशूसह प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपान करण्यासाठी स्थानकांत उभारलेल्या हिरकणी कक्षाची देखभाल करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहेत.
मुंबई : नवजात शिशूसह प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपान करण्यासाठी स्थानकांत उभारलेल्या हिरकणी कक्षाची देखभाल करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहेत. ‘हिरकणी कक्षाचा बोजवारा’ या मथळ्याने ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत महामंडळाने हे आदेश गुरुवारी दिले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवजात शिशूंना स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष उभारले. मात्र अधिकाºयांच्या अनास्थेमुळे, योजनेबाबत प्रवाशांमध्ये जागरूकता न झाल्यामुळे हे कक्ष अडगळीचे ठिकाण बनले. यासंदर्भातीले वृत्त ‘लोकमत’च्या ६ आॅगस्ट, सोमवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले. त्याची दखल घेत परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सर्व विभागांना हिरकणी कक्षाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई आगार स्थानकात गुरुवारी प्रसिद्ध पत्रकानुसार, ‘बस स्थानकावरील हिरकणी कक्षामध्ये पुरुष, कर्मचाºयांना प्रवेश देऊ नये. असे झाल्यास वाहतूक नियंत्रकावर कारवाई होईल,’ अशी सूचना आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. दरम्यान, प्रत्येक स्थानकावर उद्घोषणेतून ‘येथे हिरकणी कक्ष असून याचा लाभ घ्यावा,’ अशा सूचना, फलक लावणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.