Join us

संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्करमुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे, त्या मंडळांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कर

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे, त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरत्या जोडणीच्या वीज वापरासाठी घरगुती वीजदर आकारत तात्पुरती वीज जोडणी देण्यात आली आहे. शिवाय गणेशोत्सवाच्या कालावधीत पाऊस पडत असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाका किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड द्या. स्वीच बोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करा. वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घ्या. काही कारणास्तव वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीज यंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लायटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करा. मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने म्हटले आहे.