आगीपासून वास्तूची अशी घ्या काळजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 05:51 AM2018-11-17T05:51:11+5:302018-11-17T05:51:53+5:30
गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी करताना ती अधिकृत व्यक्तीकडूनच करावी.
संदीप पवार
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध व्यवसायांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने विद्युत जोडणी व विद्युत उपकरणे, एल.पी.जी. सिलिंडर, पाइप्ड नॅचरल गॅस, रॉकेल, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड यासारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. या इंधन प्रकारानुसार संबंधितांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत आणि अनुषंगिक नियम, सूचना इत्यादींची मुद्देसूद माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीबाबत अग्निशमन दलानेही आगीपासून वास्तूची काळजी कशी घ्यावी? याबाबत मार्गदर्शन केले आहे.
अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे किंवा अयोग्य विद्युत जोडणीमुळे आगी लागतात असे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेता विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन / स्वीच), वायरिंग याबद्दल अत्यंत सजग असणे अतिशय गरजेचे आहे. व्यावसायिकांनी / संबंधितांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी विद्युत उपकरणांनुसार किती क्षमतेचा विद्युत प्रवाह (वीजदाब) लागणार आहे? याची तपासणी करून त्यानुसार विद्युत वितरण कंपनीकडून जोडणी घ्यावी. सर्व विद्युत खटके (बटन / स्वीच), वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे इत्यादी हे वीज दाब क्षमतेला अनुरूप व आय. एस. आय. प्रमाणित असावेत. त्यांची जोडणी, फिटिंग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करवून घ्यावी. मीटर केबिनसह, ज्या ठिकाणाहून विद्युत जोडणी आपल्या जागेत येते, त्याठिकाणी मेन स्वीचबरोबरच एम.सी.बी. / इ.एल.सी.बी. हे तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बसवून घ्यावेत. या उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट झाल्यास किंवा कुणाला शॉक लागल्यास विद्युत प्रवाह आपोआप खंडित होण्याची व्यवस्था असते. कोणतेही नवीन विद्युत उपकरण घेताना ते आपल्या विद्युत जोडणीच्या दाब क्षमतेला अनुरूप आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच घ्यावे. तसेच नव्याने घेण्यात येणारे एखादे विद्युत उपकरण अधिक दाब क्षमतेचे असल्यास आपली विद्युत जोडणी देखील तेवढ्या दाब क्षमतेची करवून घेण्यासाठी विद्युत वितरण कंपनीला कळवावे. यानुसार विद्युत दाब क्षमता वाढविण्यात आल्यानंतर सदर उपकरणाचा वापर करावा.
वजनानुसार एल.पी.जी. सिलिंडरचे सामान्यपणे ३ प्रकार आहेत. यामध्ये १४.२ किलो, १९.२ किलो व ४५ किलो यांचा समावेश आहे. या सर्वच सिलिंडरचा साठा व वापर करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सिलिंडर हे अधिकृत गॅस वितरकाकडून व अधिकृतपणेच खरेदी करावे. सिलिंडर घेतानाच त्यात लिकेज नसल्याची खातरजमा गॅस कंपनीच्या अधिकृत व्यक्तीकडून करवून घ्यावी. गॅस लिकेजची खातरजमा करूनच गॅस सिलिंडर देणे, हे गॅस वितरण कंपनीच्या प्रतिनिधीला देखील बंधनकारक आहे, याची आवर्जून नोंद घ्यावी. सिलिंडर घेताना लिकेज तपासणी करतेवेळी लिकेज असल्याचे लक्षात आल्यास लगेचच सिलिंडर बदलवून घ्यावे.
सिलिंडरचा साठा करताना किंवा वापरताना ते बंदिस्त जागी ठेवू नयेत. सिलिंडर आडवे ठेवल्यास लिकेज होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे ते सिलिंडर कोणत्याही परिस्थितीत आडवे ठेवू नये. सिलिंडर हे नेहमी उभेच ठेवावे. सिलिंडरचा साठा करताना त्याची सेफ्टी कॅप लावलेली असणे आवश्यक आहे. सिलिंडरजवळ कोणत्याही प्रकारचा ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नये. एक सिलिंडर, दोन सिलिंडर किंवा दोनपेक्षा अधिक सिलिंडर यांचा एकाच वेळी वापर करायचा असल्यास किंवा साठा करायचा असल्यास तो दिलेल्या परवानगीनुसारच करणे बंधनकारक आहे. दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास त्यावर महापालिकेद्वारे जप्तीची व दंडात्मक कारवाई केली जाते.
गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी करताना ती अधिकृत व्यक्तीकडूनच करावी. तसेच यासर्व बाबींची नियमितपणे तपासणी अधिकृत व्यक्तीकडून करून घ्यावी. यापैकी एखादी बाब खराब असल्याचे निदर्शनास आल्यास ती दुरुस्त करावी अथवा नवीन घ्यावी व तंत्रज्ञाच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करावी. तसेच गॅसचा पाइप रबराचा असल्यास तो २ मीटरपेक्षा अधिक लांबीचा नसेल याची काळजी घ्यावी. गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने शटआॅफ व्हॉल्व / रेग्युलेटर बंद करावे. दरवाजे-खिडक्या तातडीने उघडाव्यात. तसेच कोणतेही विद्युत उपकरण वा बटन बंद अथवा चालू करु नये. तेलाचे दिवे, मेणबत्ती, उदबत्ती इ. सारखे आगीचे इतर स्रोत बाजूला करावेत किंवा विझवावेत. तसेच दारे-खिडक्या तातडीने उघडून खेळती हवा वाढेल व गॅस बाहेर निघून जाईल असे बघावे. शक्य असल्यास सदर सिलिंडर मोकळ्या जागेत किंवा मैदानात नेऊन ठेवावे. त्याचबरोबर जिथे गॅस गळती झाली असेल तेथून लवकरात लवकर बाहेर पडून सुरक्षित जागी जावे. गॅस गळतीबद्दल संबंधित गॅस कंपनीला व अग्निशमन दलास तातडीने कळवावे. गॅस गळती स्वयंचलित पद्धतीने शोधून त्याची सूचना देणारे अत्याधुनिक गॅस लिकेज डिटेक्टर तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनानुसार बसवून घ्यावे. परवानगीनुसार गॅस सिलिंडरचा साठा असलेल्या ठिकाणी तसेच गॅस शेगडीच्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने गॅस लिकेज डिटेक्टर बसवावे.
गॅस पाइप, संबंधित उपकरण व शेगडीजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नयेत. स्वयंचलित पद्धतीने गॅस गळती शोधणारे गॅस लिकेज सेन्सर्स बसवून घ्यावेत. गॅस गळती झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने आयसोलेशन व्हॉल्व / शटआॅफ व्हॉल्व बंद करावा. तसेच दारे-खिडक्या तातडीने उघडून खेळती हवा वाढेल व गॅस बाहेर निघून जाईल असे बघावे. त्याचबरोबर जिथे गॅस गळती झाली असेल तेथून लवकरात लवकर बाहेर पडून सुरक्षित जागी जावे. गॅस गळतीबद्दल महानगर गॅस कंपनीला व अग्निशमन दलास तातडीने कळवावे.
विद्युत उपकरणे, विद्युत वायरिंग, विद्युत खटके, मेन स्वीच, एम.सी.बी. / इ.एल.सी.बी. इत्यादींची तंत्रज्ञांकडून नियमितपणे तपासणी करवून घ्यावी व आवश्यक तेथे वेळोवेळी गरजेनुसार तातडीने सुधारणा करवून घ्याव्यात. ज्या खोलीत अन्न शिजविले जातात किंवा पदार्थ तयार केले जातात, त्या खोलीमध्ये गॅस, लाकूड इत्यादी इंधन प्रकारानुसार तापमान कमी जास्त असू शकते. हे लक्षात घेऊन त्या खोलीतील वायरिंग, विद्युत खटके, विद्युत उपकरणे इत्यादींची तपासणी संबंधित तंत्रज्ञांकडून स्वतंत्रपणे व नियमित केली जावी.