Join us

एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 7:18 PM

राज्य सरकारच्या  आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांना  कर्करोग, मधुमेह ,  रक्तदाब आहे, अशा कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर बोलावू  नये, असे आदेश असून सुद्धा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे.

 

मुंबई : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर येथे एसटी बसची सेवा सुरू आहे. तर, राज्यभरातील नॉन रेड झोनमध्ये  एसटीची सेवा सुरू आहे. मात्र राज्यभरातील अनेक आगारात फिजिकल डिस्टिंगचे पूर्णपणे तीन तेरा वाजलेत. राज्यभरात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर बोलावून कामगिरी न देता परत घरी पाठविण्यात येत आहे.  राज्य सरकारच्या  आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांना  कर्करोग, मधुमेह ,  रक्तदाब आहे, अशा कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर बोलावू  नये, असे आदेश असून सुद्धा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेनी केली आहे.

एसटी  महामंडळाचे राज्यभरात एकूण ३१ विभाग असून करोनाच्या पार्श्वभूमीवर एस टी च्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यलयाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिपत्रके काढायला हवी होती, मात्र  महामंडळाच्यावतीने असे करण्यात आले नाही.   प्रत्येक विभाग मनमानी परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास सांगत आहे. त्यामुळे एसटी महामंडळात अनेक ठिकाणी विसंगती दिसून येत आहे. परिणामी, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेतीची भावना निर्माण झालेली आहे.तसेच कोरोना मुळे बिघडलेले आर्थिक चक्र पुन्हा मार्गावर आण्यासाठी एक वर्ष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीस शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र एसटी महामंडळाकडून या वर सुद्धा परिपत्रक काढण्यात आलेले नाही,  असा आरोपही त्यांनी केला आहे, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेसचे यांच्यावतीने केला आहे.  

एस.टी.महामंडळाच्या मुख्यालयातील कर्मचारी वर्ग शाखेला कामगारांच्या सुरक्षिततेची अजिबात काळजी नसल्याचे दिसून येते. या गलथान कारभाराला जो कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. 

------------------------------ 

राज्यातील आगारांसह मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी जिथे कर्मचाऱ्यांची गरज लागते, तेवढेच कर्मचारी कामावर बोलवल्या जात आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले जात नाही,  अशी माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्यांनी दिली. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस