Join us

लेप्टो पसरणार नाही याची काळजी घ्या!

By admin | Published: August 19, 2016 3:48 AM

मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपात दाखल होत आहेत. मात्र हा उत्साह शेवटपर्यंत

मुंबई : मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपात दाखल होत आहेत. मात्र हा उत्साह शेवटपर्यंत टिकावा आणि या काळात साथीचे आजार पसरू नयेत म्हणून सार्वजनिक आरोग्याबाबत प्रत्येकाने आपल्या विभागात उंदीर, डासांचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यावी; जेणेकरून लेप्टोस्पायरोसिस व इतर साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही, असे आवाहन महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना केले आहे.गणेशोत्सवात मुंबईकरांना आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली असून, प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांसाठी माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेद्वारे मंडळांना आरोग्यासह विविध घटकांबाबतच्या सूचना आणि आवाहन करण्यात आले आहे. मंडळांनी मोकळ्या जागेवरील माती, कचरा काढून घेण्याची काळजी घ्यावी. तसेच त्यांनी आवश्यकतेनुसार कचरा साठवण्याची व्यवस्था करावी. श्रीगणेशाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या रांगेची व्यवस्था करणे हे मंडळाचे काम राहील. यामध्ये वाहतूक, पादचारी व इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी. रांगेच्या भागात कचरा साठवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची जबाबदारी मंडळाची राहील. मंडपात तसेच मंडपाच्या आजूबाजूच्या परिसरात महापालिकेने तयार केलेली भित्तीपत्रके, कापडी फलक आणि समाजोपयोगी माहितीपत्रके प्रदर्शित करावीत. मंडपाच्या परिसरात आग विझवण्यासाठी सहज उपलब्ध होईल अशा रीतीने रेतीच्या बादल्या व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. मंडपाजवळील अग्निशमन केंद्राचा संपर्क क्रमांक मंडळातील जबाबदार कार्यकर्त्यांकडे असावा,अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत. (प्रतिनिधी) खाद्यपदार्थांची खरेदी तपासून करा- गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर माव्याच्या पदार्थांची खरेदी केली जाते. जर हे पदार्थ शिळे असतील तर त्याच्या सेवनामुळे आजार उद्भवू शकतात. परिणामी असे पदार्थ खरेदी करताना ते पदार्थ ताजे आणि खाण्यास योग्य आहेत, हे तपासूनच खरेदी करावेत. - गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करतात, त्याला प्रतिबंध घालावा. यासाठी आवश्यक मदत लागल्यास महापालिकेच्या संबंधित खात्यातील वरिष्ठ निरीक्षकाशी संपर्क साधावा.गणेश मंडळांना आवाहन- शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना करावी, मूर्तीची उंची अनावश्यक मोठी होणार नाही, याची काळजी घ्यावी.- थर्माकोल, प्लास्टर आॅफ पॅरिस आणि प्लास्टिक या साहित्याचा वापर टाळावा, मूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांचा वापर करावा.