अशी घ्या पावसाळ्यात मोबाइलची काळजी!
By admin | Published: July 5, 2016 02:14 AM2016-07-05T02:14:20+5:302016-07-05T10:29:14+5:30
पावसाळा सुरू झाला की प्रत्येक जण आपल्या वस्तूंची काळजी घ्यायला लागतो. आॅनलाइनच्या या जमान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘मोबाइल’ हा अनेकांच्या जगण्याचा अविभाज्य
- रोहित गुरव, मुंबई
पावसाळा सुरू झाला की प्रत्येक जण आपल्या वस्तूंची काळजी घ्यायला लागतो. आॅनलाइनच्या या जमान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘मोबाइल’ हा अनेकांच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या खास मोबाइलची काळजी घ्यायलाच हवी. पावसाळ्यात मोबाइलकडे दुर्लक्ष केल्यास खिशाला मोठा फटका बसू शकतो. म्हणूनच यंदाच्या पावसाळ्यामध्ये तुमच्या या लाडक्या मोबाइलची काळजी कशी घ्याल यासंदर्भात खास टीप्स.
भर पावसात मोबाइलवर बोलणे टाळा
भर पावसात रस्त्यावरून चालताना मोबाइलवर बोलणे शक्यतो टाळा. महत्त्वाचा कॉल असेल तर आडोशाला पावसापासून सुरक्षित ठिकाणी जाऊन बोला. रेनकोट किंवा छत्रीखाली आपण असलो तरी वाऱ्याप्रमाणे बदलणारा पाऊस कोणत्याही दिशेने येऊन आपला मोबाइल भिजवू शकतो. अशावेळी मोबाइल भिजला तर खासकरून स्पीकर, रींगर, माईक, डिस्प्ले या मोबाइलच्या अवयवांत पाणी जाऊन ते खराब होऊ शकतात.
प्लास्टीक कव्हर घाला
पावसाळ्यात मोबाइल भिजून बंद पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पावसाळ्यात मोबाइलला प्लास्टीक कव्हर आवर्जून घाला. बाजारात अगदी क्षुल्लक किमतीमध्ये हे मोबाइल प्लास्टीक कव्हर किंवा लॉकिंग कव्हर उपलब्ध आहे.
मोबाइल कसा सावरावा
मुलांनी मोबाइल शर्ट्सच्या वरच्या खिशात चुकूनही ठेवू नये. पावसाळ्यात रस्त्यामध्ये पाण्याने भरलेले खड्डे असल्याने वरच्या खिशातून मोबाइल पाण्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाइल पॅन्टच्या खिशात ठेवताना पॅन्ट ओली तर नाही ना याची खातरजमा करून मगच मोबाइल खिशात ठेवावा. मुलींनी पर्समध्ये मोबाइल ठेवताना पावसाच्या पाण्यापासून मोबाइल सुरक्षित आहे ना याची आधी खात्री करून घ्यावी. ओल्या हाताने मोबाइल हाताळू नका, त्याने स्क्रीनला हानी पोहोचू शकते.
बॅटरी चार्ज करताना जरा सांभाळून
पावसाळ्यात मोबाइलची बॅटरी चार्ज करताना जरा सावध राहा. मोबाइल ओला असल्यास चुकूनही बॅटरी चार्ज करू नका. मोबाइलचे चार्जर सॉकेट किंवा बॅटरी चार्जरचे पीन ओले नाही ना हे तपासून मगच मोबाइल चार्जिंगला लावा. मोबाइलमधून बॅटरी बाहेर काढून चार्ज करणे शक्यतो टाळा. या दिवसांत आसपास असणारा ओलावा, दमटपणा उघड्या बॅटरी चार्जिंगसाठी घातक ठरू शकतो.
ब्लुटूथ व ईयर फोन वापरणे टाळा
भर पावसात ब्लुटूथचा वापर घातक ठरू शकतो. पावसाच्या पाण्याने ब्लुटूथची बॅटरी शॉर्ट होऊन घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्या पाण्याने ब्लुटूथची बॅटरी, स्पीकर, माईक हे अवयव निकामी होऊ शकतात. ईयरफोनचा वापरही पावसात आर्थिक नुकसान पोहचवू शकतो.
पावसात मोबाइल भिजल्यास
पावसात मोबाइल भिजल्यास सर्वप्रथम बॅटरी, सीमकार्ड व मेमरी कार्ड बाजूला काढून ठेवा. ओला मोबाइल सुरू करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कोणतेही ऐकीव प्रयोग न करता त्वरित मोबाइल रिपेअरिंगला टाका.
बॅकअप ठेवा
पावसाळ्यात कोणत्याही क्षणी मोबाइल भिजून नादुरुस्त होण्याची परिस्थिती ओढावू शकते. अशावेळी मोबाइलमध्ये असणारा महत्त्वाचा डेटा नाहीसा होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून आत्ताच मोबाइलमधल्या डेटाचा बॅकअप घेऊन ठेवा. जेणेकरून मोबाइल नादुरुस्त झाला तरी महत्त्वाचे फोन नंबर, फोटो व अत्यंत महत्त्वाचा डेटा तुमच्याकडे सुरक्षित असेल.