आपले सरकारी ओळखपत्र सांभाळा! 

By मनोज गडनीस | Published: March 13, 2023 09:12 AM2023-03-13T09:12:14+5:302023-03-13T09:12:49+5:30

आजवर इतक्या बारकाईने कदाचित कुणीच याबाबत विचार केला नसेल, पण आता वेळच तशी आली आहे.

take care of your government id | आपले सरकारी ओळखपत्र सांभाळा! 

आपले सरकारी ओळखपत्र सांभाळा! 

googlenewsNext

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

नव्या मोबाईलचे कनेक्शन घ्यायचे असेल किंवा अन्य काही काम असेल तर आपल्या ओळखपत्रांची (ज्यावर आपले नाव, जन्म दिनांक, घरचा पत्ता) छायांकित प्रत मागितली जाते. आपल्या ओळखीसाठी आणि अस्तित्वाच्या पुराव्यासाठी सरकारतर्फे अशी कागदपत्रे आपल्याला जारी केली जातात आणि वर नमूद कामांसाठी आपण ती सहज देतो. पण ती देताना तुमच्या ओळखीचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे किंबहुना, तुमची कागदपत्रे जर एखाद्या आर्थिक कारणांसाठी गैरप्रकारे वापरली गेली तर हातात थेट बेड्या पडायची देखील शक्यता आहे. त्यामुळे यापुढे तुमचे कोणतेही ओळखपत्र कुणालाही द्यायचे असेल तर त्या कागदपत्राच्या छायांकित प्रतीवर तिला प्रमाणित करण्यासाठी स्वाक्षरी केल्यानंतर खाली ती प्रत कोणत्या कारणासाठी देत आहोत हे नमूद करायला विसरू नका. आजवर इतक्या बारकाईने कदाचित कुणीच याबाबत विचार केला नसेल, पण आता वेळच तशी आली आहे. 

गेल्या १५ दिवसांपूर्वी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा उजेडात आणत एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने हजारो व्यक्तींच्या ओळखपत्रांचा गैरवापर केला आणि त्याद्वारे थेट सरकारी तिजोरीलाच गंडा घातला. झाले असे की, गोवंडी, मानखुर्द अशा झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांना ही घोटाळेबाज व्यक्ती भेटली. एका बँकेने काही योजना सुरू केली असून त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम बँकेत खाते काढावे लागेल, असे त्याने सांगितले. आता बँक खाते सुरू करायचे असेल तर तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड अशी ओळखपत्रे लागतील असे सांगत त्यांचे ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रती ताब्यात घेतल्या. या छायांकित प्रतीचा वापर करून अशा तब्बल ५०० गरीब लोकांच्या नावे या व्यक्तीने जीएसटी नोंदणी क्रमांक प्राप्त केला. या जीएसटी नोंदणी क्रमांकांच्या आधारे त्याने देशात काही कंपन्यांची स्थापना देखील केली. अर्थातच या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात होत्या. कागदोपत्री निर्माण केलेल्या या कंपन्यांच्या नावे काही मालाची आवक-जावक झाल्याचेही त्याने कागदावरच दाखवले आणि त्याचे बनावट चलन तयार करत त्याद्वारे राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून त्या व्यवहारावर कोट्यवधी रुपयांचा परतावा (इनपूट क्रेडिट) प्राप्त केला.

विभागाच्या विशेष शोध मोहिमेमध्ये हा घोटाळा उघड झाला आणि अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला अटक केली. लोकांनी विश्वासाच्या आधारे स्वतःची ओळखपत्रे या आरोपीला दिली होती. आपल्या ओळखपत्राचा असा वापर होईल, हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते.

छायांकित प्रत कोणत्या कारणासाठी?

- कुणी आपल्याला कागदपत्रांची छायांकित प्रत मागितली की, आपण ती अगदी सहज देतो.

- देताना फारसा विचार करत नाही. पण या घटनेतून बोध घेत अशा पद्धतीने कागदपत्रे देताना किमान काळजी घेणे आवश्यक आहे.

- त्यामुळेच वर नमूद केल्याप्रमाणे अशा छायांकित प्रतीवर ती कोणत्या कारणासाठी देत आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा आणि अर्थातच असा उल्लेख केल्यावर त्या छायांकित प्रतीची आणखी एक छायांकित प्रत काढून आपल्या रेकॉर्डवर ठेवावी. यामुळे ती प्रत नेमकी कशासाठी दिली होती, याचा पुरावा आपल्या हाती राहील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: take care of your government id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.