Join us  

पावसाळ्यात असे सांभाळा आराेग्य! महापालिकेचा आरोग्य विभाग काय सांगतो...

By संतोष आंधळे | Published: June 16, 2023 1:43 PM

येत्या काही दिवसांत नियमितपणे पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

संताेष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणारे दवाखाने, रुग्णालये तसेच खासगी आरोग्य व्यवस्थेतील सर्वच डॉक्टरांना पावसाच्या या हंगामात प्रचंड मागणी असते. जनरल प्रॅक्टिशनरचे दवाखाने फुल्ल झाल्याचे चित्र या काळात दरवर्षी पाहायला मिळते. त्यामुळे या काळात  तब्बेतीची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा या पावसाच्या काळात ज्या काही आजारांची चलती असते, त्यामुळे नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर सांगतात.

गेल्या काही महिन्यांपासून उन्हामुळे अंगाची लाही आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाला आहे. त्यामुळे सगळेच जण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. येत्या काही दिवसांत नियमितपणे पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र, आल्हाददायक वाटणारा हा पावसाळा येताना सोबत आजारही घेऊन येतो. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ आणि अतिसाराचे आजार होण्याची शक्यता अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. आजूबाजूच्या परिसरात पाणी साचल्यामुळे  डासांची पैदास होऊन मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार या काळात मोठ्या संख्येने डोके वर काढतात. पावसाच्या दूषित पाण्यात चालल्याने लेप्टोस्पायरोसिससारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात आजारी पडू नये, यासाठी प्रत्येकाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे.

महापालिकेचा आरोग्य विभाग काय सांगतो...

  • रस्त्यावरचे खाणे टाळा. 
  • काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. 
  • सार्वजनिक परिसरात वावरताना डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
  • अंगांवर रॅश, श्वास घेण्यास त्रास झाल्यास, अधिक तीव्र प्रमाणात ताप आल्यास पालिकेच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करा.
  • लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि एच १ एन १ च्या रुग्णांमध्ये विशेष वाढ
  • उपचार घेण्यास उशीर केल्यास गुंतागुंत निर्माण होऊन आजार जिवावर बेतू शकतो.
  • पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालण्याचे टाळा.  
  • पावसाच्या दूषित पाण्यात चालल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक उपाय करून घ्यावेत. 
  • स्वतःहून औषधे घेऊ नयेत.
टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका