जुन्या, दुरुस्ती सुरू असलेल्या पुलांवर घ्या काळजी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 02:07 AM2020-08-20T02:07:33+5:302020-08-20T02:07:37+5:30
पुलांवर ध्वनिक्षेपकांचा वापर करू नये, जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरून पुढे जावे.
मुंबईतील जुन्या अथवा दुरुस्ती सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलांचा, गणेशमूर्ती आगमन अथवा विसर्जन प्रसंगी उपयोग करताना अतिभार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. विशेषत: मिरवणुका यंदा टाळायच्या असल्याने मूर्ती आगमन, विसर्जनाच्या वेळेस पुलांवर गर्दी करू नये, पुलांवर थांबून राहू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
करी रोड उड्डाणपूल व आॅर्थररोड उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी उड्डाणपूल या पुलांवर एका वेळेस भाविकांचे व वाहनांचे मिळून १६ टनापेक्षा अधिक वजन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पुलांवर ध्वनिक्षेपकांचा वापर करू नये, जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरून पुढे जावे.
या पुलांवर सावधान
मध्य रेल्वेवरील : घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, आॅर्थर रोड रेल्वे उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपूल
पश्चिम रेल्वेवरील : मरीन लाइन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नीरोडदरम्यान), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडदरम्यान), केनडी रेल्वे उड्डाण पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडदरम्यान), फॉकलॅण्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलदरम्यान), बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ, महालक्ष्मी स्टील रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी- कॅरोल रेल्वे उड्डाणपूल, दादर-टिळक रेल्वे उड्डाणपूल.
>पाट, वाळू त्वरित मिळेल
कृत्रिम तलावांमध्ये जास्तीत जास्त विसर्जन करण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. चौपाट्यांवर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. जेणेकरून त्यांना विसर्जनाचा पाट तसेच वाळू त्वरित देण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.