थंडीत पाळीव प्राण्यांची काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:45 AM2019-12-23T01:45:50+5:302019-12-23T01:46:17+5:30
सर्दी, अपचन यांसारखे आजार होण्याची शक्यता
मुंबई : हिवाळा सुरू झाल्यावर पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. वयस्कर प्राण्यांची शक्यतो जास्त देखभाल केली पाहिजे. अन्यथा त्यांना सर्दी, अपचन हे आजार होण्याची शक्यता असते. हिवाळा हा केसाळ श्वानासाठी आरोग्यदायी असतो. या महिन्यात त्वचारोग होण्याचे प्रमाण कमी असते. परंतु मानवाने पाळीव प्राण्यांना आपल्या कुशीत घेऊन ऊब द्यावी, त्यामुळे दोघांमध्ये प्रेम वाढते, असे पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पशुवैद्यकीय डॉ. मनीष पिंगळे म्हणाले की, थंडीचे प्रमाण पहाटे जास्त असल्यामुळे श्वानाला किंवा इतर प्राण्यांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाऊ नये. सकाळी उशिरा किंवा दुपारी फिरण्यासाठी घेऊन जावे. रात्रीच्या वेळीही पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी घेऊन जाऊ नये. सकाळी ऊन असल्यावर प्राण्यांना फिरण्यासाठी घेऊन गेल्यास आपल्याला आणि प्राण्यांनाही व्हिटामिन ‘डी’ मोठ्या प्रमाणात मिळते. थंडीच्या वेळी पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील केसांमध्ये कोरडेपणा येतो. कोरडेपणा घालविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेलाचा वापर करवा. प्राण्यांना आंघोळ घालतेवेळी त्यांचे केस कोरडे राहतील असाच शॅम्पू किंवा साबण वापरावा. थंडीचे कपडे मार्केटमध्ये उपलब्ध असून बाहेर जाताना त्याचा वापर करावा.
थंडीमध्ये प्राण्यांच्या नाकाची त्वचा फाटते, त्यातून काही वेळा रक्तस्रावदेखील होतो. यासाठी खोबरेल तेल किंवा इतर क्रीमसुद्धा वापरू शकता. पाळीव प्राण्यांना थंडीच्या मोसमात आंघोळ कमी प्रमाणात घालावी. म्हणजेच पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून एकदा आंघोळ घालावी. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात उष्माघाताचा फटका प्राण्यांवर बसतो. तसाच थंडीमध्येही उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे प्राण्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी द्यावे. थंडीमध्ये प्राण्यांना जास्त भूक लागते. परंतु थंडीत प्राण्यांची हालचाल कमी होते. यावेळी प्राण्यांचे जेवण समतोल ठेवावे. झोपण्याच्या जागेवर उबदार कपडे ठेवावेत, असेही डॉ. मनीष पिंगळे यांनी सांगितले.