मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोडधोड पदार्थांची मागणी वाढली आहे. मात्र, खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकारही दिवसागणिक वाढत आहे. याकरिता, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत भेसळखोरांवर कारवाई करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत शहर-उपनगरातील काही ठिकाणी एफडीएने धाड टाकून कारवाई करून, भेसळयुक्त खाद्यतेल, खवा, दूध इ. अन्नपदार्थांचा माल जप्त केला आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहावे, तसेच दुकानदारांकडे बिलाची मागणी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.सणासुदीच्या काळात रवा, मावा, तेल, बेसन आदी पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने गुप्तचर यंत्रणेची मदत घेऊन, भेसळखोरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, दिवाळीच्या काही दिवस आधीच प्रशासनाने शहरात छापे टाकून मोठ्या प्रमाणात सुटे तेल जप्त केले होते.नागरिकांनी शक्यतो मिठाई खरेदी करताना दुकानदारांकडून बिलाची मागणी करावी. त्यामुळे जर विषबाधेचे प्रकार घडल्यास, त्या दुकानदाराला दोषी धरता येऊ शकते, असे अन्नव औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले.ही काळजी घ्या! दूध, दुग्धजन्य ताजेच घ्यावेतपरवाना- नोंदणीधारक विक्रेत्यांकडून मिठाई, किराणा माल खरेदी करा.मावा व मिठाई शक्यतो ताजीच वापरावी, ती खराब होणार नाही, अशा तापमानात स्वच्छ जागेत ठेवावी, जेणेकरून विषबाधेचे प्रकार होणार नाहीत.मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना, ती ताजी आहे की नाही, याची खात्री करावी.बिलाशिवाय मिठाई, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करू नयेत.दुग्धजन्य पदार्थ नोंदणीधारक व परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावेत.खवा-मावा खरेदी करतानाही वास आणि रंग यावर लक्ष ठेवा.उघड्यावरील मिठाई, खवा खरेदी करू नये.माव्यापासून तयार केलेले पदार्थ २४ तासांच्या आतच खावेत.मिठाईवर बुरशी आढळल्यास ती खाऊ नये.मिठाई खराब असल्याची शक्यता किंवा चवीत फरक जाणवल्यास खाऊ नये.
मिठाई खरेदी करताना घ्या काळजी!, अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 4:35 AM