उत्तर मुंबईतून जास्तीत जास्त वॉर्ड जिंकून आणण्याची जबाबदारी घ्या; आशिष शेलार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
By मनोहर कुंभेजकर | Published: July 1, 2023 05:00 PM2023-07-01T17:00:32+5:302023-07-01T17:00:48+5:30
उत्तर मुंबई गेली अनेक वर्षे भाजपाचा गड राहिलेला आहे.
मुंबई : उत्तर मुंबई गेली अनेक वर्षे भाजपाचा गड राहिलेला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्तर मुंबईतून जास्तीत जास्त वॉर्ड जिंकून आणण्याची जबाबदारी घ्या,आगामी पालिका निवडणुका यश संपादन करण्यासाठी आपला जनसंपर्क मजबूत ठेवा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात देशाची केलेली सर्वांगीण प्रगती,शिंदे-फडणवीस यांनी गेल्या १ वर्षात केलेले विकास कार्य जनतेसमोर मांडा असे आवाहन मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार अँड.आशिष शेलार यांनी काल रात्री बोरीवलीत भाजप कार्यकर्त्यांना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारल ९ वर्षे पूर्णत्वाच्या निमित्ताने महा जनसंपर्क अभियान अंतर्गत जाहिर सभा उत्तर मुंबई भाजप तर्फे बोरिवली पश्चिम,लिंक रोड,ओपन कन्व्हेवशन सेंटर येथे आयोजित केली होती. यावेळी भर पावसात मोठ्या संख्येने येथील प्रमुख भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एकेकाळी योगाभ्यासासाठी विरोधकांनी आपली चेष्टा केली होती आज जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व योग दिनाला मान्यता मिळवून दिली. मुंबईतील जनते समोर येणाऱ्या काळात पालिका मध्ये झालेले भ्रष्टाचार उघडकीस आणले जातील असे शेलार यांनी स्पष्ट केले.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त रित्या आयुष्मान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या अमलिकरणासाठी राज्य सरकारचे अभिनंदन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ३७७ नियम त्यांनी हा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे आणि संसदेत माडल्याबद्धल उत्तर मुंबईतील भाजप आमदार आणि उत्तर मुंबई भाजपाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आ.योगेश सागर, आ. अतुल भातखळकर,आ.मनीषा चौधरी,आ.सुनील राणे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षात भारताच्या झालेल्या सर्वांगिण विकास कार्याची माहिती दिली.
जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी प्रास्ताविक करताना मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी उत्तर मुंबई भाजप प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, मुंबई भाजप सचिव विनोद शेलार, योगेश वर्मा, प्रदेश सचिव राणी द्विवेदी, वरिष्ठ नेते अँड.जे.पी मिश्रा, सरचिटणीस दिलीप पंडित, बाबा सिंह,निखिल व्यास, माजी नगरसेवक, महिला आघाडी, युवा आघाडी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस दिलीप पंडित यांनी केले.