मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा म्हाडा घेणार ताबा, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 05:27 AM2019-06-29T05:27:20+5:302019-06-29T05:28:31+5:30
मुंबईत मोडळकीस आलेल्या इमारती दुरुस्त करण्यासाठी जर बिल्डर तयार होत नसतील त्या इमारती म्हाडा ताब्यात घेऊन विकसित करेल
मुंबई : मुंबईत मोडळकीस आलेल्या इमारती दुरुस्त करण्यासाठी जर बिल्डर तयार होत नसतील त्या इमारती म्हाडा ताब्यात घेऊन विकसित करेल. शिवाय बिल्डर घरभाडे देत नाहीत यावर उपाय म्हणून तीन वर्षांचे घरभाडे आधीच घेतले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात वाढ करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेवर, उत्तर देताना ते बोलत होते. येत्या तीन वर्षांत मुंबईतील सर्व प्रकल्प पूर्णपणे मार्गी. पुर्नविकासाचे १२५ प्रस्ताव आले होते त्यापैकी ८० प्रस्तावांना मान्यता दिली असून त्यांना एसआरएच्या माध्यमातून गती देण्यात येईल. त्यासाठी ३ वर्षांचे भाडे आधीच घेतले जाईल, असेही ते म्हणाले.
येत्या काळात हायब्रीड मेट्रोचा प्रकल्प नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केला जाईल. तेथे तो यशस्वी झाल्यास मुंबईत व अन्य मोठ्या शहरात केला जाईल. या प्रकल्पांतर्गत टायरवर चालणारी मेट्रो आणली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विरार-अलिबाग प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हा प्रकल्प १२३ किलोमीटरचा असेल. या मागार्मुळे संपूर्ण एमएमआर प्रदेश विकसित होणार असून पुढच्या २० वर्षांची महाराष्ट्राची वाढ ही मुंबई प्रदेशामुळे होईल. जागतिक बँकेच्या मदतीने हा मल्टीमोडल कॉरिडॉर केला जाईल. राष्ट्रीय महामार्ग ३, ४, ४ ब, ८, १७, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, भिवंडी बायपास यांना जोडला जाईल. त्यातून विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि तळोजा अशी सात विकास केंद्र तयार होतील. नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी बंदराला हा कॉरिडॉर जोडला जाईल. जेएनपीटीकडे नवी मुंबई व ठाण्यातून जाणारी वाहतूक बाहेरुन जाईल. विरार-अलिबाग प्रवासाचा वेळ ५0 टक्के कमी होणार. प्रकल्पाला मान्यताही दिल्याचे ते म्हणाले.
ठळक मुद्दे
डीएननगर-दहिसर मेट्रो २ अ १८.६० किमी लांबीची असून त्यासाठी ६४१० कोटींचा खर्च. ६५ टक्के काम पूर्ण. २०२० मध्ये कार्यरत होईल.
२ ब डीएननगर-वांद्रे ते मंडाले, ही २३.६४ किमी. १०,९८६ कोटी खर्च. २०२२ पर्यंत काम पूर्ण होईल.
मार्ग ४ अ कासारवडवली-गायमुख, ही छोटी लिंक. लवकरच कामास सुरुवात. २०२२ पर्यंत पूर्ण होणार.
ठाणे-भिवंडी-कल्याण हा २५ किमी लांबीचा प्रकल्प. ८४१७ कोटी खर्च. डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल.
स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग- विक्रोळी, हा १४.४७ किमीचा ६७१६ कोटींचा खर्च. काम २०२२ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व, हा १६.५० किमी मार्ग. ६२०८ कोटी. ६८ टक्के पूर्ण. २०२० मध्ये कार्यान्वित होईल.