भार्इंदर : दहिसर पश्चिम ते अंधेरीच्या डी. एन. नगरदरम्यानचा मेट्रो प्रकल्प भार्इंदरमार्गे वसई-विरारपर्यंत न्यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे ठाण्याच्या कासारवडवलीपासून दहीसर पूर्वेला येणारी मेट्रोही या प्रकल्पाला जोडावी, असे त्यांनी सुचवले आहे. अंधेरी ते दहिसर हा २ अ मेट्रो प्रकल्प दहिसर पश्चिम ते भार्इंदर पश्चिम आणि पुढे वसई-विरारपर्यंत वाढवावा. दहिसर पूर्व ते कासारवडवली असा आणखी एक मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. तो मीरा-भार्इंदर शहराच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजमार्गे भार्इंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट, पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत आहे. तो मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाला जोडावा. यामुळे मीरा रोड, भार्इंदर, वसई-विरार या शहरांतील प्रवास सूकर होऊन त्यांना पर्यायी व जलद वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल. यावर मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यु. पी. एस. मदान यांना या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.मीरा-भार्इंदर शहर हे वसई-विरारला पश्चिम रेल्वे आणि रस्त्यामार्गे जोडले आहे. यातील रेल्वेचा पर्याय जलद असल्याने तो सोईस्कर ठरतो. पण गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करणे त्रासदायक ठरते. मुंबई-अहमदाबाद महामार्गाद्वारे वसई-विरारला जाता येते. पण त्यावरील वरसावे पुलाची गेल्या सहा महिन्यांपासुन दुरुस्ती सुरु आहे. तेथे नवा पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. ते अंतरही मोठे आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालयाने मुंबई-बडोदा एक्स्प्रेस मार्गाला मान्यता दिली आहे. एमएमएआरडीएमार्फत दहिसर पश्चिम ते वसई-विरारला जाणारा नवीन लिंक रस्ता प्रस्तावित आहे. पण या दोन्ही पर्यायी रस्त्यांचे काम पूर्ण होण्यास काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. तोवर दोन्ही शहरांतील लोकसंख्या झपाट्याने वाढेल आणि हे रस्तेही तोकडे पडतील. त्यामुळे या पर्यायी रस्त्यांप्रमाणेच मेट्रोचाही विस्तार गरजेचा बनल्याकडे सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
दहिसरची मेट्रो थेट विरारपर्यंत न्या
By admin | Published: March 16, 2017 2:49 AM