मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केली असून, ते मित्रपक्षांना बरोबर घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे युतीचं घोडं अद्यापही भिजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना युतीसाठी आटोकाट प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवसेनेबरोबरचा युतीचा निर्णय आज घ्या, असा आदेश अमित शहांनी महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वाला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांसह भाजपाचे वरिष्ठ नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत.येत्या 48 तासांत युतीला अंतिम स्वरूप द्या, अन्यथा आम्ही आमच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करू असे अल्टिमेटम शिवसेनेने भाजपाला दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपामधील युतीचे भवितव्य काय याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान, निवडणूक तोंडावर आली तरी, युतीचे घोडे चर्चेच्या फडातच अडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे, दुसरीकडे भाजपा-शिवसेनेचे दोन वरिष्ठ मंत्री हे युतीसाठीची चर्चा करीत आहेत.युती करण्यासाठी शिवसेनेने तीन अटी ठेवल्या आहेत. त्यात पालघरची जागा शिवसेनेला द्यावी तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागांचेही वाटप व्हावे. दुसरी अट अशी की, शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा. (उदा. नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करणे ) आणि तिसरी अट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी, या अटींचा समावेश आहे. मात्र, यापैकी एकाही अटीला अद्याप भाजपाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.युतीला अंतिम स्वरुप देण्यात आले असून त्यात भाजपाला लोकसभेच्या 25 व शिवसेनेला 23 जागा, तर विधानसभेच्या 145 जागा भाजपा तर 143 जागा शिवसेना लढणार असल्याची चर्चा होती. मात्र दोन्ही बाजूंकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. पालघरची जागा सोडण्याची भाजपाची तयारी नाही. मात्र, मोदी वा शहा यांच्यापैकी एक जण येत्या काही दिवसांत मातोश्रीवर जाऊन युतीसाठी शिवसेनेचा हात मागेल, असे मानले जाते. आम्ही या मुद्यावर युतीचा निर्णय घेतला हे शिवसैनिकांना पटण्यासारखी बाब भाजपाकडून मान्य झाल्याशिवाय शिवसेना युतीला होकार देणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
युतीचा निर्णय आजच घ्या, 'शाही' आदेशानंतर मुख्यमंत्र्यांची मातोश्रीकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 8:55 PM