निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलन
By admin | Published: October 12, 2015 05:31 AM2015-10-12T05:31:09+5:302015-10-12T05:31:09+5:30
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय शेतकऱ्यांना वेड्यात काढणारा असून, सरकारने तो त्वरित मागे घ्यावा
मुंबई : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय शेतकऱ्यांना वेड्यात काढणारा असून, सरकारने तो त्वरित मागे घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आरोग्य खात्याने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा एक शासनादेश (जीआर) काढला आहे. याबाबत ‘आजारापेक्षा उपाय भयंकर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध होताच सर्व थरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेसने या वृत्ताची दखल घेत संबंधित जीआर मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकारने पुरेशी आर्थिक मदत न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, परंतु या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवर मानसोपचार करण्यासंदर्भात शासननिर्णय जाहीर करणे म्हणजे त्यांना वेडे ठरविण्याचाच प्रकार आहे. शेतकऱ्यांचा अवमान करणारा हा शासन निर्णय तातडीने मागे घ्या, नाहीतर प्रदेश काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करेल,’ असा इशाराही त्यांनी दिला. संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांच्यावर मानसोपचार करण्याची कल्पना नेमकी कोणाच्या ‘सुपीक डोक्या’तून निघाली, याचा सरकारने शोध घ्यावा, त्यांच्यावरच मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करावेत, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)