जैन मंदिर कारवाई प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा - मंगलप्रभात लोढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 05:47 IST2025-04-23T05:46:41+5:302025-04-23T05:47:32+5:30
मंगलप्रभात लोढा; भूषण गगराणी यांची घेतली भेट, संबंधित अधिकाऱ्यांसोबत भूषण गगराणी यांनी तत्काळ संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत

जैन मंदिर कारवाई प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा - मंगलप्रभात लोढा
मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पालिकेच्या कारवाईत पाडण्यात आले. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना, न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळाल्या दिवशीच अधिकाऱ्यांनी मंदिर पाडले. ही घटना खेदजनक असल्याचे मत कौशल्य विकास व मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली.
संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ
चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी; तसेच मंदिराच्या जागेची पाहणी करून तेथे मंदिराची पुनर्बाधणी करण्याची मागणी त्यांनी केली. जैन समाजाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन मागण्या मांडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिका प्रशासनाने, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि मंदिर पुनर्स्थापित करण्यात यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगराणी यांना पत्र दिले. यावेळी माझ्यासह आमदार पराग आळवणी, आमदार मुरजी पटेल उपस्थित होते. pic.twitter.com/kbYzWCdMDI
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 22, 2025
तक्रार नोंदविण्याची सूचना
जैन समाजाच्या प्रतिनिधींकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या विषयावर आयोगाकडून मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीत आयोगाचे प्रमुख प्यारे खान यांनी म्हटले की, जैन समुदाय हा शांतीप्रिय समाज आहे. आयोगाकडून मंदिराच्या ठिकाणाचे सर्वेक्षण करण्यात आले. पार्श्वभूमीवर मंदिराच्या ट्रस्टींनी मंदिर पाडकामाची, नुकसानीची पोलिस तक्रार नोंदवावी, अशा सूचना दिल्या आहेत.
तत्काळ संयुक्त बैठक घेण्याचे दिले निर्देश
संबंधित अधिकाऱ्यांसोबत भूषण गगराणी यांनी तत्काळ संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. ही बैठक होईपर्यंत प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे नमूद केले आहे. यावेळी आमदार पराग आळवणी, आमदार मुरजी पटेल आणि जैन समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.