मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयआयटी बोम्बेमधील सर्व विद्यार्थ्यांना येत्या 72 तासांत म्हणजेच 20 मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश संचालक सुभाषिश चौधरी यांच्याकडून देण्यात आले आहेत. आयआयटी बॉम्बेकडून या आधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार आयआयटी बॉम्बेमधील सर्व लेक्चर्स, सेंट्रल लायब्ररी सारख्या सुविधा आणि प्रयोगशाळा या आधीच बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य आणि देशांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगळवारी आयआयटी बॉम्बेमधील सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येत्या 72 तासांत आयायटीमधील येण्या जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जे विद्यार्थी परदेशात राहतात किंवा ज्या विद्यार्थ्याना वैद्यकीय कारणामुळे आपल्या मूळ गावी परतणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी संबंधित डीनची परवानगी तेथील वास्तव्यसाठी घेणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत आयआयटीमधील खानावळ बंद करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी विशेष परवानगी घेतल्यास मर्यादित व्यवस्था करता येणे शक्य असल्याचे चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. संकुलातील सेंट्रल लायब्ररी बंद राहणार असून संशोधनाचे कार्यही तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.