बारावीच्या मोजक्याच विषयांची परीक्षा घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:06 AM2021-04-10T04:06:02+5:302021-04-10T04:06:02+5:30
शिक्षक महासंघाची मागणी; इतर विषयांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर करा लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने ...
शिक्षक महासंघाची मागणी; इतर विषयांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जर ऑफलाइन घ्यायचीच असेल तर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन निवडक विषयांचीच परीक्षा घ्यावी, असा प्रस्ताव कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाने शिक्षणमंत्र्यांसमोर मांडला. महत्त्वाच्याच विषयांची परीक्षा घेऊन निकाल लावल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षा अल्प काळात पूर्ण होतील आणि आवश्यक मूल्यांकनही होईल, असे मत त्यांनी मांडले.
पुढील प्रवेशाच्या दृष्टीने बारावीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द होणे व्यवहार्य नाही. त्या वेळेत न झाल्यास शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याचीही भीती आहे. अशा परिस्थितीत बारावीच्या परीक्षासंदर्भात काही पर्याय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सुचविले आहेत. सर्वात आधी सध्याच्या परिस्थितीत ऑफलाइन परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलाव्यात, असे त्यांनी सुचविले आहे. त्यानंतर बारावीच्या सर्व विषयांची सरसकट सर्व विषयांची परीक्षा न घेता त्यांना पुढील शैक्षणिक करिअरसाठी आवश्यक किंवा प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांचीच परीक्षा घ्यावी, असे मत महासंघाने मांडले.
वाणिज्य शाखेमधील अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, विज्ञान शाखेमधील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स तसेच कला शाखेतील इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी अशा विषयांची परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली. इतर विषयांच्या मूल्यांकनासाठी त्यांना त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावरून श्रेणीनिहाय मूल्यांकनाची व्यवस्था करावी. तसेच विषयांच्या परीक्षेत पुरेसे अंतर ठेवून परीक्षांचे नियोजन शक्यतो सकाळच्या वेळेत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
.....................