दक्षिण मुंबई मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. एफआयआर नोंदवून घ्या आणि त्यांना तातडीने अटक करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांचा प्रचार करत असताना अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर टीका केली होती. येथे इंपोर्टेड माल चालत नाही. आमच्याकडे इंपोर्टेड माल चालत नाही, ओरिजनल माल चाललो, असं विधान अरविंद सावंत यांनी केलं होतं. त्या विधानाविरोधात शायना एनसी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. तसेच आता शायना एनसी यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
दरम्यान, अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया देताना शिंदे गटाने नेते किरण पावसकर म्हणाले की, अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमच्या उमेदवार शायना एनसी याच एफआयआर दाखल करत आहेत. हा केवळ शायना एनसी यांचाच अपमान नाही आहे तर महाराष्ट्रातील तमाम महिलांचा आहे. याबाबत अधिक पोलीस चौकशी करण्याची आवश्यकता नाही, प्रसारमाध्यमांमधून अरविंद सावंत यांचं वक्तव्य सर्वांनी ऐकलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी नुसतं निवेदन न घेता एफआयआर नोंदवून घ्यावी आणि अरविंद सावंत यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे, असे किरण पावसकर म्हणाले. तर अरविंद सावंत यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
तर मी कधी कुठल्या महिलेचा अपमान केलेला नाही करणारही नाही. राहिला प्रश्न तर मी त्यांना काही म्हटलेलं नाही नाही तर माझा उमेदवारालाही हा ओरिजनल माल आहे, असे बोललो आहे. त्यामुळे ती चित्रफीत पूर्ण पाहा, अर्धवट पाहू नका. त्यामुळे माल या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन विपर्यास करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. तो त्यांचा प्रयत्न अयशस्वी होईल, असे या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना अरविंद सावंत म्हणाले होते.