फ्लॅट घ्या.. पण सर्च रिपोर्ट जरूर तपासा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:07 AM2019-12-09T03:07:22+5:302019-12-09T06:19:28+5:30

एजंटावर भरवसा नको

Take the flat .. But be sure to check out the search report! | फ्लॅट घ्या.. पण सर्च रिपोर्ट जरूर तपासा !

फ्लॅट घ्या.. पण सर्च रिपोर्ट जरूर तपासा !

googlenewsNext

- दत्ता यादव 

सातारा : स्वत:चं हक्काचं घर असावंं हे प्रत्येकाला वाटतं. आयुष्याची पुंजी साठवून घर घेण्यासाठी अनेकजण प्रतिष्ठा पणाला लावतात. मात्र, नव्या घरात पाऊल टाकण्यापूर्वीच आपली फसवणूक होतेय, हे ज्यावेळी समजते, त्यावेळी आयुष्य संपल्यासारखी स्थिती त्यांची होते.

खरं तर भावनिकतेच्या ओघात सतर्कतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा प्रकारची वेळ अनेकांवर येत असल्याचे समोर येत आहे.
अनेक नवविवाहित बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिरातींना भुलून फ्लॅट घेतात़ ते जाहिरात व त्या बांधकाम व्यावसायिकाच्या नावाला भुलून व्यवहार करतात़ त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून फसविले जाण्याच्या घटना सध्या सर्वत्र घडत आहेत.एका बाजूला घराचा ताबा मिळत नाही म्हणून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ येते, तर दुसरीकडे फायनान्स कंपनीचा हप्त्याचा मीटर मात्र जोरात सुरू असतो़ अशा प्रकारे अनेक नवविवाहित दुष्टचक्रात अडकलेले दिसून येतात़

सध्या दिवसेंदिवस जमिनीचे दर गगनाला भिडल्यामुळे फ्लॅट संस्कृती उदयास येऊ लागली आहे. सर्वसामान्यांना आणि नोकरदारांना अनेक आमिषे दाखवून आकर्षित केले जात आहे. नवं घर घेताना फारसी फसवणूक होत नाही. मात्र, जुने फ्लॅट घेताना अनेकांची मोठी फसवणूक झाल्याचे पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारींवरून दिसून येते. फ्लॅट खरेदी करताना अलीकडे एजंटाचा आधार घेतला जातोय, हे अत्यंत धोकादायक आहे.

संबंधित एजंट केवळ आपल्याला या व्यवहारामध्ये भलेमोठे घबाड मिळेल, या आशेवर असतो. त्यामुळे तो हा व्यवहार निपटण्यासाठी वाट्टेल ते करतो. म्हणजेच बोलबच्चनगिरी करून तो फ्लॅट समोरच्या व्यक्तीच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतो. हा परिसर सेफ आहे, मुबलक पाणी आहे आणि पाण्याची नवी योजना होणार आहे. शाळा, कॉलेज जवळ आहेत. भविष्यात तुम्हाला हा फ्लॅट विकायचा झाल्यास पन्नास लाखांच्यावर किंमत येईल, अशी बतावणी करतो. त्यामुळे फ्लॅट खरेदी करणारा लगेच भविष्याची स्वप्नं रंगवून ठेवतो.

आपण घेत असलेल्या फ्लॅटच्या कागदपत्रांवर बोजा आहे का? इमारतीला परवानगी आहे का? याची कसलीही चौकशी न करता थेट टोकण देऊन व्यवहार फिक्स केला जातो. इथेच घर, फ्लॅट घेणाऱ्याची मोठी फसगत होते. आपण खरेदी करणाºया फ्लॅटच्या कागदपत्रांची नेमकी कुठे चौकशी करावी, हेही अनेकांना माहिती नसते. त्यामुळे एजंटावर किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून व्यवहार पूर्ण केला जातो. वास्तविक काहीजण असे व्यवहार करताना सतर्कताही दाखवितात; परंतु हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

काय काळजी घ्याल?

मिळकतीचा इतिहास बघा..
कुठलीही मिळकत खरेदी करण्याआधी त्या मिळकतीचा इतिहास तपासा. शासनाच्या वेबसाईटवर २००२ नंतरच्या सर्व व्यवहारांची सर्व माहिती उपलब्ध आहेत. त्याआधीची माहिती जिल्हा निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. यामध्ये मिळकतीवर कर्जाचा बोजा आहे का? मिळकत आधी कुणाला विकली गेली आहे? मिळकतीमधील हिस्सेदार यांची सर्व माहिती मिळते.

घर घेताना याची तपासणी गरजेची
घर घेण्याआधी ज्या जमिनीवर ते उभे आहे, ती जागा एनए आहे का?
इमारतीचा प्लॅन नगररचना विभागाची मान्यता घेऊन तयार केला आहे का ?
संबंधित बांधकामाला सक्षम प्राधिकाºयाची बांधकाम परवानगी आहे का ?या मिळकतीवर कुठल्या कर्जाचा बोजा आहे का ? हे तपासावे.

साताऱ्यात गेल्या दोन वर्षांमध्ये फ्लॅट खरेदी करताना चक्क सात पोलिसांनाही फसवलं गेलंय. कायद्याचे ज्ञान असणारेही यातून सुटले नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल, याचा आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे सर्तकता आणि आधुनिकतेची जोड घेऊन आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करावं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

जमीन, घर खरेदी व्यवहार करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता मिळकतीचा इतिहास पाहून घेणे आवश्यक आहे. मात्र, संगणकावर सर्च रिपोर्ट पाहिल्यानंतर आपल्याला हव्या त्या मिळकतीचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर दिसतो. त्यानंतर आपण व्यवहार केले पाहिजेत.

२००२ पासून सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. सिटी सर्व्हे, गट नंबर त्या ठिकाणी टाकल्यानंतर संबंधित मिळकतीवर किती व्यवहार झाले. त्या मिळकतीवर कर्ज आहे की नाही, हे समजते. त्यामुळे कोणतेही घर, फ्लॅट, जागा घेताना आधुनिकतेची जोड देऊन जीवन सुखकर आणि सुरक्षित करावे, असे सहायक जिल्हा निबंधक एम. बी. खामकर यांनी केले आहे.

मालमत्तेचा व्यवहार करताना मध्यस्थी फक्त एजंटच असतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यांना पैसे दिले की आपल्याला सर्व माहिती आणि आपली फसवणूक होणार नाही, असे त्यांना वाटते. मात्र, ही त्यांची मोठी चूक आहे. कुठल्याही मिळकतीचा सर्च रिपोर्ट असतानाही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:च्या पायावर दगड मारून घेतात.
- एम. बी. खामकर, सहायक जिल्हा निबंधक, सातारा

पूर्वीच्या मिळकतींचा सर्च रिपोर्ट जिल्हा निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. त्यानंतरच्या व्यवहारांच्या नोंदणी आॅनलाइन पाहता येतात. मात्र, हे अनेकांना माहिती नसल्यामुळे अनेकजण असे व्यवहार एजंटांच्या रामभरोशावर सोडून देत आहेत. काहीजण वकिलांना पैसे देऊन फ्लॅटची इत्थंभूत माहिती घेण्यास सांगतात, तर काहीजण पैसे जातील म्हणून स्वत: केवळ एजंटावर विश्वास ठेवून फ्लॅट खरेदी करतात.

Web Title: Take the flat .. But be sure to check out the search report!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.