‘त्या’ प्रवाशांची पूर्ण माहिती घ्या
By admin | Published: November 18, 2016 06:50 AM2016-11-18T06:50:05+5:302016-11-18T06:50:05+5:30
रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर टीसींकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
सुशांत मोरे / मुंबई
रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर टीसींकडून दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईदरम्यान दंड भरताना प्रवाशाने ५00 किंवा १000 रुपयांची नोट दिल्यास, त्या प्रवाशाची सर्व माहिती घेण्याची अजब सूचना रेल्वेकडून तिकीट तपासनिसांना देण्यात आली आहे. खोट्या नोटा पकडण्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्या फक्त रेल्वेसह अन्य विभागांत वापरण्यात येतील, अशी माहिती केंद्राकडून देतानाच, त्यासाठी मुदतही देण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या आरक्षण केंद्राचा आधार घेतला. त्याचप्रमाणे, विनातिकीट प्रवासी किंवा सेकंड क्लासच्या तिकिटावर फर्स्ट क्लासचा प्रवास करणारा प्रवासी आढळल्यास, अशा प्रवाशांकडून कारवाईदरम्यान ५00 आणि १000 रुपयांच्या जुन्या नोटा टीसींना देण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात देण्यात येणाऱ्या जुन्या नोटा, तिकीट खिडक्यांवर, तसेच टीसींकडे सुट्या पैशांची भासणारी चणचण, याचबरोबर खोट्या नोटाही मिळण्याची शक्यता असल्याने, रेल्वेने या सर्व गोष्टींना लगाम लावण्याचा निर्णय घेतला आणि संबंधित विभागांना तशा सूचनाही केल्या.
जुन्या नोटा बंद केल्यानंतर, या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम हा टीसींकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवर झाला. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे ‘कलेक्शन’ही १0 नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान कमी झाले. या सर्व गोंधळामुळे टीसींना दंडात्मक कारवाईवेळी प्रवाशांकडून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना केल्या. मात्र, या नोटा स्वीकारताना खोट्या नोटाही मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रवाशांकडून या नोटा घेताना, सोबत प्रवाशांची सर्व माहिती घेण्याची सूचनाही टीसींना दोन दिवसांपूर्वीच करण्यात आली. प्रवाशाचा मोबाइल नंबर, ओळखपत्राची माहिती घेण्यास सांगितले. त्याचबरोबर, नोटांवरील असलेल्या नंबरचीही नोंद घेण्याची सूचना केली, जेणेकरून रेल्वेत पैसे जमा करताना खोटी नोट आढळल्यास, कोणत्या प्रवाशाकडून ही नोट मिळाली आहे,त्याची तत्काळ माहिती उपलब्ध होईल आणि त्या प्रवाशावर पुढील कारवाई करणेही सोप्पे जाईल,अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.