- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. हा प्रसार मुलांमध्ये होऊ नये म्हणून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानुसार पालिकेकडून मुंबईमधील नऊ केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाणार आहे. पण मुलांचे लसीकरण करत असताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. उदय कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद.
मुलांच्या लसीकरणासाठी आयुर्वेदातील कोणत्या सूचनांचे पालन करावे?ज्या वेळेस प्रौढावस्था असते, त्या वेळेस शारीरिक वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा कालावधी असतो. त्या वेळी अधिक काळजी घेऊन लसीकरण करावे. त्याकरिता, लसीकरण करण्यापूर्वी घृतपान करावे. म्हणजेच, लसीकरणापूर्वी तीन दिवस २० ते ३० ग्रॅम तूप प्यायला द्यायचे. लसीकरणानंतरही ही तीन दिवस ही क्रिया सुरु ठेवायची. याखेरीज, जेवणात हळदीचा वापर करावा, या गोष्टी शरीरासाठी उपयुक्त ठरतात. तसेच आवळा खाण्यानेही फायदा होतो.
कोणती खबरदारी घेणे गरजेचे ?लसीकरण करताना इंजेक्शन देताना रक्त आले नाही ना याची विशेष काळजी घ्यायची, तसे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे शक्यतो या काळात सर्दी, खोकला वा ताप आलेल्या लाभार्थ्यांनी लसीकरण करू नये. कारण या काळात प्रतिकारकशक्ती कमी असते. तसेच, विशेष मुलांनी अधिक खबरदारी घेतल्याशिवाय लसीकरण करु नये. आजारपणात लसीकरण घेऊन आजार बळावल्यास बऱ्याचदा लसीकरणाला दोष दिला जातो, हे टाळण्यासाठी प्रकृती उत्तम असताना लसीकरणास प्राधान्य द्यावे.
लसीकरणाचे दुष्परिणाम किंवा गुंतागुंत टाळण्यास काय करणे आवश्यक आहे?पित्त म्हणजेच नाजूक प्रकृतीची मुले-मुली असतात, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लस घेऊ नये. अस्थमा, रक्ताशी निगडित आजार, कफ असे विकार असणाऱ्यांनी लस घेण्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करावी. तसेच, लसीकरणानंतर किमान तीन दिवस या लाभार्थ्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे. दरम्यानच्या काळात जंकफूडच्या सेवनावर बंधन आणावे. तसेच, कोणतीही तक्रार उद्भवल्यास त्वरित पालकांना सांगावे. मग त्यात डोकेदुखी, त्वचेवर व्रण, ताप, दम, जुलाब, अपचन, अंगदुखी असे काही वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे, सहव्याधी असणाऱ्या लहानग्यांनीही डॉक्टरांची लसीकरणासाठी संमती घ्यावी. इंजेक्शन दिलेल्या जागी चोळणे, शेकणे अशा गोष्टी करु नये.