मुंबई : केंद्रीय आरोग्य विभागाच्या मंत्रिमंडळातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षा, देशातील १० भाषांमधून घेण्यात येणार आहेत, पण या परीक्षेतून उर्दू भाषेला वगळण्यात आले आहे. त्यामुळे उर्दू भाषेतून ही नीट परीक्षा घेण्यात यावी, म्हणून स्टुडंट इस्लामीक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहेत. सेंसेस अहवालानुसार, देशात उर्दू भाषेचा सहावा क्रमांक लागतो, तर भारतीय संविधानात उर्दू भाषेचा आठवा क्रमांक आहे. कनिष्ठ महाविद्यालयात हजारो विद्यार्थी हे उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची पुस्तके उर्दू भाषेत उपलब्ध आहेत. तथापि, नीट परीक्षा उर्दू भाषेत घेतली जाणार नसल्याने, उर्दू माध्यमातील मुलांचे नुकसान होईल, असे मत एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्राचे जनसंपर्क सचिव मोहम्मद अली शेख यांनी दिली. (प्रतिनिधी)एस.आय.ओ. तर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, नीट परीक्षेतून उर्दू भाषेला वगळणे म्हणजे केवळ उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची संधी गमावणे नसून, त्यांच्या भविष्याशी केलेला खेळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आवडत्या क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी संधी देण्यात यावी, असे शेख यांनी सांगितले.
‘नीट’ उर्दूतूनही घ्यावी
By admin | Published: February 21, 2017 4:10 AM