Ambadas Danwey: 'गोपीनाथ मुंडें विमा योजना' कंपन्यांकडून काढा, अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 01:20 PM2023-03-03T13:20:45+5:302023-03-03T13:24:08+5:30
विमा कंपन्यांकडून दलाली सुरू असते, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या कंपन्यांकडून केली जाते.
मुंबई - केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर व्हावं किंवा शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी नवनवीन योजना अमलांत आणतं. शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी विमा योजना असते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अपघात झाल्यासही त्यांना मदत मिळावी म्हणून राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावे अपघात विमा योजना सुरू केली आहे. शेती व्यवसाय करत असताना अपघात झाल्यास या योजनेला लाभ संबंधित शेतकऱ्याला मिळतो. मात्र, ज्या कंपन्यांना या योजनेचं कंत्राट दिलंय, त्यांकडून बळीराजाची अडवणूक होत असते. त्यावरुन, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद सभागृहात प्रश्न उपस्थित केला. तसेच, शेतकऱ्यांकडे ही योजना शासनाने स्वत: राबवावी, अशी मागणीही केली.
विमा कंपन्यांकडून दलाली सुरू असते, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या कंपन्यांकडून केली जाते. विमा कंपन्यांना सरकार मोठ्या प्रमाणात पैसा देते, पण कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूकच केली जाते. मग, सरकारने तहसिलदार आणि कलेक्टर्संच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा देण्याची प्रक्रिया करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली.
गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजना ही विमा कंपन्यांकडे न देता सरकारने स्वतः या योजनेचे जिल्हानिहाय वितरण तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्याचा निर्णय घेणार आहे का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जी यांनी उपस्थितीत केला. @iambadasdanvepic.twitter.com/ptin2cnqCX
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) March 2, 2023
सरकारने थेट जरी शेतकऱ्यांना हा निधी दिला तरी, तो पुरतो. आपण जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय डिस्ट्रीब्युशन केल्यास ते शक्य होईल. विमा कंपन्या दलाली करत असतात. म्हणून, तहसिलदार किंवा कलेक्टर्संच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे. तसेच, सरकारने हा निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केलीय.
काय आहे योजना
शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याची कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काही शेतकऱ्यांना या अपघातामुळे अपंगत्व येते परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते त्यामुळे अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात केली गेली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य त्यामध्ये आई वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण २ जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी झाल्यास रुपये २ लाख रक्कम नुकसान भरपाई देण्यात येते.
शेतीची कामे करताना अपघात झाल्यास अपघातामुळे १ डोळा व १ अवयव निकामी झाल्यास रुपये १ लाख नुकसान भरपाई देण्यात येते.
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरते.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
शेतीची कामे करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार कडून २ लाखांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
शेतीची कामे करताना शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला शासनाकडून १ लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.