Join us

शरीर आणि मनाचे आजार दूर करण्यासाठी प्रेम आणि ध्यानधारणेची मदत घ्या - भिक्खू संघसेन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 11:58 AM

मानवी शरीराचे आजार जसे औषधाने बरे करता येतात तसे मनाचे आजार दूर करण्यासाठी प्रेम भावना आणि ध्यान यांची मदत होते, असे विधान लडाख येथे आरोग्य, शिक्षण आणि अध्यात्म क्षेत्रात कार्य करणारे भिक्खू संघसेन यांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर)मुंबईत बोलताना केले.

मुंबई - मानवी शरीराचे आजार जसे औषधाने बरे करता येतात तसे मनाचे आजार दूर करण्यासाठी प्रेम भावना आणि ध्यान यांची मदत होते, असे विधान लडाख येथे आरोग्य, शिक्षण आणि अध्यात्म क्षेत्रात कार्य करणारे भिक्खू संघसेन यांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर)मुंबईत बोलताना केले. प्रेम भावना असेल तर रुग्णावर उपचार चांगल्या पद्धतीने करता येतात. डॉ. रमण गोयल यांच्या अध्यक्षतेखाली फाल्स बॅरिअॅट्रिक आणि इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोनोमिकल एन्डोसर्जन्स यांनी मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते.  भिक्खू संघसेन पुढे म्हणाले,"मानवी शरीर हे यंत्र नाही. ते यंत्रापेक्षा तो वेगळे आहे, त्याला हृदय आहे, मन आहे, आत्मा आहे, भावना आहेत. त्यामुळे वैद्यक व्यवसायात असणा-यांनी त्याकडो यंत्र म्हणून पाहू नये. आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही चांगले कर्म करू शकाल , म्हणून शरीराचे व मनाचे आरोग्य महत्त्वाचे आहे". 

डॉक्टरांनी प्रेम भावनेने कसे कार्य करावे हे सांगताना भिक्खू म्हणाले, "लडाखमध्ये एक तिबेटीयन महिला डॉक्टर अत्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्याकडे परदेशातूनही रुग्ण येत. त्यांच्याकडे कोणतीही दुसरी वेगळी औषधे नव्हती. पण रुग्णाला केवळ प्रेमाने वागवल्यामुळे त्यांच्या उपचारांना गुण येत असे. तिबेटमध्ये प्रार्थनेशिवाय कोणताही डॉक्टर उपचार करत नाही, उपचारांमध्ये ते प्रेमभावना ओततात." आजच्या युगात अध्यात्मिक गुरू आणि वैज्ञानिकांनी एकमेकांचे गुण घेऊन एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. गरजू व्यक्तीला बरे करण्यासारखी दुसरी सेवा नाही, त्यामुळे डॉक्टरांचे कार्य मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भिक्खू संघसेन यांनी लडाखमध्ये महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर, महाबोधी ग्रीन प्रोजेक्ट, महाबोधी मोबाइल हेल्थकेइर, महाबोधी विद्यार्थीगृहे अशा विविध संस्थांची स्थापना करुन गरीब, होतकरु आणि आजारी नागरिकांची विद्यार्थ्यांची मदत केली आहे. संघसेन यांनी सेव्ह हिमालय फाऊंडेशनची ही चळवळ सुरु केली आहे. संघसेन यांच्या भाषणापुर्वी

डॉ. रमण गोयल यांनी अशा परिषदांचे व फेलोशिप कोर्सचे महत्त्व समजावून सांगितले. या परिषदेत डॉ. केशव मन्नूर, डॉ. प्रदीप चौबे, डॉ. सुभाष खन्ना, डॉ. रणदीप वाधवा, डॉ. जमीर पाशा, डॉ. माल फोबी, डॉ. मायकल गागनर, डॉ. ल्युक लेमेन्स, डॉ.. सुनील पोपट डॉ. एच. पी.गर्ग, डॉ. सायंदेव दासगुप्ता  गुप्ता तसेच वोकहार्टच्या व्यवस्थापकीय संचालक झाबिया खोराकीवाला अशा देशविदेशातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यावेळेस बॅरिअॅट्रिक अँड मेटॅबोलिक सर्जरीचा दुसरा फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला.