मुंबई: राज्याच्या कृषी विभागाने राज्यात ८७ ठिकाणी बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांविराेधात छापासत्र राबविले असता, ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. बोगस बियाण्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. बळीराजाची फसवणूक होत असताना कंपन्या या प्रकरणातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत पथके तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. बियाणे विक्रेते योग्य बियाणे, योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदेंनी यावेळी मुख्य सचिवांना दिले.
व्यावसायिकांनी पेरणीपूर्वी बनावट बियाणे, खते व औषधींचा साठा नष्ट करावा अन्यथा राज्यपालांकडे तक्रार करण्यासोबतच अशा व्यावसायिकांना किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
बोगस बियाणे करणारे कोण ?
कृषी विभागाने राज्यातील भोकरदन तालुक्यातील केदारखेडामध्ये अंदाजे छापा टाकलेल्या गोदामातून २६३ क्विंटल बियाणे जप्त केले आहे. कृषी विभागाच्या कारवाईमुळे बाजारात जाणारे शेकडो क्विंटल बोगस बियाणे पकडण्यात आले; परंतु या कारवाईपूर्वी या गोदामातून शेकडो क्विंटल बोगस बियाणे बाजारात गेल्याचा अंदाज आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. या प्रकरणी कृषी विभागाने पंचनामा केला. परंतु, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या रॅकेटमध्ये मोठे लाेक सहभागी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.