मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट लिहिली. या पोस्टनंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकी चितळेविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली होती. आज ठाण्यातील कोर्टात केतकीला हजर केले. तेव्हा कोर्टाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतकी चितळेच्या विरोधीता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे. तसेच या ट्विटमधून त्यांनी केतकी चितळेला सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, केतकी चितळे वर कारवाई झाली, आता त्याचबरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच कायदा सर्वांना समान असतो, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नवी मुंबईच्या कळंबोली पोलीसांनी केतकी चितळेला शनिवारी ताब्यात घेतल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने तिला अटक केली. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात ठाणे पोलीसांनी तिला हजर केले. यावेळी तिने न्यायालयात स्वत: युक्तीवाद केला. तिने आपली बाजू मांडण्यासाठी कोणत्याही वकिलाची नियुक्ती केली नाही. यावेळी केतकीने न्यायालयात आपली बाजू मांडताना , सोशल मिडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा प्रश्न तिने उपस्थित केला. तिला न्यायालयात हजर करताना पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
कोर्टात नेमकं काय झालं?
केतकी चितळेला कोर्टात हजर केले तेव्हा तिने बचावासाठी वकील उभे केले नाहीत. कोर्टात तिने स्वत:च युक्तिवाद केला. तुमची काही तक्रार आहे का असं कोर्टाने विचारताच ती नाही म्हणाली. तर तुमचे वकील कोणी आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना केतकी म्हणाली, नाही. मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे. मी जे काही पोस्ट केले तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. केतकीने तिची बाजू इंग्लिशमध्ये कोर्टात मांडली.