अजय परचुरेमुंबई : दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास, महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्ड विभागाचे कर्मचारी असमर्थ ठरले आहेत. या अधिकाऱ्यांविरोेधात येणाºया सततच्या तक्रारी, कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, तसेच उच्च न्यायलयाच्या आदेशाला न जुमानता त्याला केराची टोपली दाखविणाºया जी नॉर्थ वॉर्डच्या सहायक आयुक्तांवर महापालिकेने कडक ताशेरे ओढले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटीलमधील अधिकृत व्यापारी आणि ‘लोेकमत’ने या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली होती. या गोष्टींची दखल घेत कारवाई करण्यास असमर्थ ठरलेल्या जी नॉर्थ वॉर्ड अधिकाºयांना, उपायुक्तांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नुसती कारवाई करून थांबू नका, तर रोजचा कारवाईचा रिपोर्ट महापालिकेला सादर करा, असे आदेशही उपायुक्त रमेश पवार यांनी जी नॉर्थ वॉर्डचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना दिले आहेत.‘क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, त्याची दखल घेऊन मंगळवारी २२ मे रोजी महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डमधील अतिक्रमण विभागाने पहाटे ५ ते ८ या वेळेत मंडई आणि दादर स्टेशनच्या आसपासच्या परिसरातील तब्बल १५० हून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. त्याच वेळी यापुढेही दररोज ही कारवाई सुरू राहील, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र, हे कारवाईचे १ दिवसाचे नाटक होते, हे त्यानंतर स्पष्ट झाले. या एक दिवसाच्या नाट्यमय कारवाईनंतर पुढे या अनधिकृत फेरीवाल्यांचा धंदे राजरोसपणे सुरूच आहेत. या फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्यानेच, जी नॉर्थ वॉर्डचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील व्यापाºयांनी केला होता.हे सगळे आरोप होत असतानाही आणि रेल्वे स्थानकाच्या १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे धंदा करू नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही, या आदेशाला जी नॉर्थ वॉर्डचे अधिकारीही जुमानत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. या सर्व बाबींच्या तक्रारी पालिका आयुक्तांपर्यंत गेल्याने, आयुक्तांनी याची कडक शब्दांत दखल घेतली आहे. मंगळवारी खैरनार यांना तत्काळ कारवाई करून, दरदिवशी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
‘त्या’ फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करा - पालिका उपायुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 2:03 AM