अनधिकृत खाद्यविक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करा-रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:30 AM2018-03-03T04:30:16+5:302018-03-03T04:30:16+5:30
फेरीवाला धोरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी फेरीवाले किंवा पथविक्रेता समिती स्थापन करण्यात येत आहे.
मुंबई : फेरीवाला धोरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी फेरीवाले किंवा पथविक्रेता समिती स्थापन करण्यात येत आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अशी समिती स्थापन करण्याचे, तसेच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.
मुंबईतील अनधिकृत फेरीवाले आणि चुकीच्या पद्धतीने जीवनावश्यक वस्तुंची साठवण यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते. या लक्षवेधीवरील चर्चेत अजित पवार, आशिष शेलार, योगेश सागर, अमित साटम, अतुल भातखळकर, मनिषा चौधरी आदींनी सहभाग घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पथविक्रेता समितीची रचना करण्यात येणार आहे. या समितीत संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त किंवा नगरपरिषद वा नगरपंचायतींचे मुख्याधिकारी अध्यक्ष असतील. ५ पदसिद्ध सदस्य, पथविक्रेत्यांमधून निवडून आलेले ८ प्रतिनिधी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. फेरीवाला क्षेत्रांतर्गत शेतकरी बाजार करता येईल का, या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली.