ठाकरे यांच्या आमदारकीबाबत तातडीने निर्णय घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:01 AM2020-04-30T06:01:32+5:302020-04-30T06:01:48+5:30

मंत्रिमंडळाने पाठविलेल्या प्रस्तावावर काय निर्णय घेतला याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Take immediate decision regarding Thackeray's MLA post | ठाकरे यांच्या आमदारकीबाबत तातडीने निर्णय घ्या!

ठाकरे यांच्या आमदारकीबाबत तातडीने निर्णय घ्या!

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वावरून अर्थात आमदारकीवरून निर्माण झालेला तिढा लवकरात लवकर सोडविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरीचे नेते राजू शेट्टी यांच्यासह जनता दल, शेकापच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. याबाबत मंत्रिमंडळाने पाठविलेल्या प्रस्तावावर काय निर्णय घेतला याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, जनता दलाचे शरद पाटील, न्या. बी. जी. कोळसे पाटील, श्याम गायकवाड, प्रताप होगाडे, राजू कोरडे, प्रभाकर नारकर आदी नेत्यांनी राज्यपालांना निवेदन पाठविले आहे. विधान परिषदेतील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस ९ एप्रिलला करण्यात आली. २८ एप्रिलला त्याबाबत मंत्रीमंडळाने पुन्हा एकदा तशी शिफारस केली. २० दिवस झाले तरी याबाबत निर्णय झालेला नाही. कोरोना विषाणूच्या साथीमुळे सद्यस्थितीत कोणत्याही निवडणुका घेणे शक्य नाही. राज्यातील सारी जनता आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे, धडपडत आहे. या अशा आणीबाणीच्या प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याच पदाविषयी शंका आणि संभ्रम राहणे योग्य नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
>निर्णयाची माहिती जनतेला कळायला हवी
कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत त्वरित निर्णय घ्यायला हवा होता. आता तरी याबाबत काय निर्णय घेतला आहे, याची माहिती जनतेला विनाविलंब कळायला हवी. निर्णय न होण्यामागे काही तांत्रिक अडचण असेल, राज्य मंत्रिमंडळाने पाठविलेल्या प्रस्तावाबाबत काही आक्षेप वा त्रुटी असतील आणि त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत असेल तर तेही राज्यातील जनतेला कळले पाहिजे, अशी भूमिका या नेत्यांनी राज्यपालांकडे मांडली आहे.

Web Title: Take immediate decision regarding Thackeray's MLA post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.