पुणे : लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महाराष्ट्र घडवणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. विद्यार्थ्यांनी दोघांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन देश घडवावा, असे विचार अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्ताने बुधवारी संवाद पुणे आणि श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ढेरे म्हणाल्या, अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या साहित्यातून समरसता हेच सूत्र दिसून येत आहे. भारत पारतंत्र्यात असताना साहित्य लिहिणे अवघड होते. आता सगळ्यांनी एकत्र येऊन देश घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दीपक टिळक म्हणाले, माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नांकडे अण्णा भाऊंनी लक्ष वेधले. साठे यांच्या लिखाणामुळे प्रस्थापित साहित्याचा केंद्रबिंदू बदलला. साहित्यातून परिवर्तन घडू शकते हे या दोघा महापुरुषांच्या साहित्यातून दिसून येते.महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, यावेळी उपस्थित होते.टिळक आणि साठे कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र आल्याने मन भरून आले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ आॅगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावी, अशी मागणी साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे यांनी केली आहे.