बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं अमृता फडणवीस यांना खुलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 01:25 PM2020-08-08T13:25:20+5:302020-08-08T19:40:58+5:30
आपले सामाजिक योगदान किती ? ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण काहीही बोलू शकतो हा सल्ला आपल्याला दिला कोणी ?? जरा सांभाळून बाईसाहेब, अशा शब्दात माजी पोलीस अधिकारी विश्वास कश्यप यांनी पत्र लिहिलं आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले जात आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन मुंबई पोलिसांवर टीकास्त्र सोडलं होतं. मुंबईत राहणं असुरक्षित वाटत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
अमृता फडणवीस यांच्या विधानावर सत्ताधारी शिवसेना नेत्यांनी पलटवार केला होता, गेली ५ वर्ष याच पोलिसांची सुरक्षा घेऊन तुम्ही फिरत होता, आता पोलिसांवर विश्वास वाटत नाही, तर खुशाल राज्य सोडून जा असा टोला मंत्री अनिल परब यांनी लगावला होता. यानंतर आता एका माजी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे अमृता फडणवीस यांना खुलं पत्र लिहित पोलिसांबद्दल बोलताना सबुरीने घ्यावं असा सल्ला दिला आहे.
काय म्हटलं आहे या पत्रात...?
सौ. अमृताबाई फडणवीस ,
पत्नी माजी मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
नागपूर .
महोदया,
आपल्याला का म्हणून पत्र लिहावे ? पत्राचा मायना काय असावा याबाबत विचार करीत होतो .
कारण कोणालाही पत्र लिहिताना त्याचे पद मग ते राजकीय, धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे असो त्याचा उल्लेख करावा लागतो . त्यादृष्टीने आपण ना कोणत्या पक्षाच्या पदावर आहात , ना कोणत्या सामाजिक, धार्मिक, संस्थेच्या पदाधिकारी आहात . कदाचित असाल ही . परंतु ते आमच्यासारख्या पामराला माहीत नसावे . म्हणून पत्रात आपला उल्लेख करताना माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असाच केला आहे . कारण त्या पलीकडे आपली खास स्वतंत्र ,विशेष अशी ओळख आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही .
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर आपला उदय झाला आहे . तत्पूर्वी आपण केलेले कोणतेही महान कार्य महाराष्ट्रापुढे आले नाही .पत्र लिहिण्यास कारण की, सुशांतसिंग राजपुतच्या प्रकरणात आपण मुंबई पोलिसांवर केलेल्या टिकेबाबत आपल्याशी काही मुद्द्यांवर संवाद साधावा म्हणून हा पत्रप्रपंच .
अमृताबाई , मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल , त्यांच्या किर्तीबद्दल आपल्याला काय आणि किती माहिती आहे ? आपला त्याबाबत अभ्यास काय ? मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल तुम्ही कुठे २/४ ओळी वाचल्या आहेत का ? की उगाचच उचलली जीभ ......
सुशांतसिंगच्या तपासाबाबत ट्वीट करताना आपण लिहिता की, मुंबई सुरक्षित नाही . आणि एकंदरच मुंबई पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही . मुळात पोलिसांचा तपास कसा असतो ? काय असतो ? तो तपास कसा केला जातो ? याबाबत आपल्याला थोडेतरी कायदेशीर ज्ञान आहे का ? याचे उत्तर नाही असेच आहे. आपण एक्सेस बँकेत काम करणाऱ्या एक कारकून महिला . आमच्या दृष्टीने जरी कोणी क्लास वन , क्लास टू असला तरी तो कारकुंडाच बरं का . कारण क्लास कोणताही असो शेवटी काम कारकुनाचेच. असो.
आपल्या पतीदेवाच्या कृपेने त्या मृत झालेल्या एक्सेस बँकेला संजीवनी देण्याचे मोठे देशकार्य आपण केलेत . सरकारी कर्मचारी , अधिकाऱ्यांचे पगार एक्सेस बँकेत वळविलेत असे समजते . कोट्यावधी रुपयांचा तो व्यवहार होता . सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तो आर्थिक घोटाळाच आहे असे आपणास वाटत नाही का? त्यावेळी सरकारी कार्यालयातील युनियनने सुद्धा त्याबाबत काही जोरदार आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. नाहीतर सरकारी वेळेपेक्षा १२/१३ मिनिटे जास्त काम करायला सांगितले तर संघर्ष करायला ही मंडळी फणा काढून उभी असतात. असो. युनियन बाबत कधीतरी.
आपण मुख्यमंत्री पत्नी झाल्याझाल्या एक्सेस बँकेने आपली बदली नागपूर हून डायरेक्ट मुंबईला केली . इथे सर्वसाधारण बाईला दादर पूर्व शाखेतून दादर पश्चिम शाखेत बदली करून घ्यायची असेल तर काय दिव्य करावे लागते हे त्या माउलीला विचारा कधीतरी .
एक्सेस बँकेला तुम्ही दिलेल्या संजीवनी बुटीमुळे त्यांनी लगेचच आपल्याला मोठे पद बहाल केले . ते सुद्धा खाल्या मिठाला जागले हो. नाहीतर साध्या कर्मचाऱ्याने बँकेसाठी कितीही मोठा धंदा केला तरी त्याला कोणीही हिंग लावून विचारत नाही. तुम्हाला मात्र बँकेने मोठी बढती दिली . बढती बद्दल आमचे काहीच म्हणणे नाही . परंतु बढती ही स्वतःच्या हिमतीवर असावी. नाही का ?
सुशांतसिंग प्रकरणात तुम्ही लक्ष घालायला नको बाईसाहेब. ही फिल्मी मंडळी कशी आहेत हे आपल्याला माहीत नाही. ते आम्हा पोलिसांना विचारा . ही मंडळी एक नंबरची स्वार्थी आणि घाणेरडी असतात . नैतिकता वगैरे शब्द त्यांनी केव्हाच गुंडाळून त्यांच्या बेडखाली ठेवलेल्या असतात . तर अशा या फिल्म इंडस्ट्री बद्दल तुम्हाला इतकी का आपुलकी वाटावी ? तुम्हाला त्यांच्या जंगी पार्ट्यांमध्ये गाण्याची संधी दिली म्हणून की काय ? त्या अमिताभ बच्चन बरोबर जाहिरात करण्याची संधी मिळाली म्हणून की काय ? अहो त्या अमिताभ बच्चन सारखा स्वार्थी माणूस संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मध्ये शोधून सापडणार नाही . स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय तो कोणाकडे बघून हसत सुद्धा नाही . त्याने संपूर्ण लॉक डाऊन मध्ये कोणा गरीबाला पाच किलो तांदूळ सुद्धा वाटले नाहीत हो. आपण फक्त मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आहात म्हणून अमिताभने आपल्याबरोबर जाहिरात केली. परंतु त्या सर्व घटनाक्रमात आपण स्वतः मात्र फारच मोठ्या सेलिब्रेटी असल्याचा समज करून घेतलात . कपूर खानदान, खान खानदान , खन्ना खानदान याबरोबरच फडणवीस खानदान बनविण्यासाठी आपण प्रयत्न करू लागलात. परंतु महाराष्ट्रात सत्तापालट झाली आणि आपले खानदान मोडीत निघाले. असो. बॅड लक .
मुद्दा असा आहे की, सुशांतसिंग प्रकरणात तुम्ही मुंबई पोलिसांना दोष दिलात. मुंबई सुरक्षित नाही असे तुम्ही म्हणालात. बाईसाहेब तुम्ही सहा वर्षांपूर्वी नागपुराहून मुंबईत आलात आणि लगेचच मुंबई पोलिसांना सर्टिफिकेट दिलेत. वर्षोनुवर्षे मुंबईत राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीला विशेषतः परप्रांतीय स्त्रीला विचारा तिला मुंबईत सुरक्षित वाटते की तिच्या राज्यामध्ये? ती पोलिसांविषयी गैरसमजुतीतून दोन गोष्टी वाईट बोलेल पण ती जास्त सुरक्षित मुंबईमध्येच आहे हे विश्वासाने सांगेन .
बाईसाहेब, बँकेची आकडेमोड करता करता मुंबई पोलिसांच्या कामाचा ग्राफ आणि देशातील इतर राज्यातील पोलिसांचा ग्राफ याचा कधीतरी शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी अभ्यास करीत चला . मुंबई पोलीस इतक्या वाईट आणि अवघड परिस्थितीत त्यांचे कर्तव्य करीत असून सुद्धा जगात दोन नंबरचे नावाजलेले पोलीस दल आहे . नंबर दोन. आणि त्या मुंबई पोलिसांना तुम्ही नावे ठेवताय ? कोणत्या अधिकाराने ? फक्त माजी मुख्यमंत्री पत्नी आहात म्हणून?
कोरोना महोत्सवात आमचे शेकडो पोलीस बांधव शहीद झालेत. जीवावर उदार होऊन दिवसरात्र, उन्हातान्हात , पावसात रस्त्यावर उभे राहून ते जनतेसाठी कर्तव्य करीत आहेत आणि तुम्ही तुमच्या फिल्मी स्टाईलने पोलिसांना बदनाम करताय . तुमच्या " फडणवीस " घराण्यातील कोणी आहे का पोलीस खात्यात ? नाही ना ? कोरोना महोत्सवात शहीद झालेल्या एकातरी कुटुंबाच्या घरी जाऊन तुम्ही त्यांची सांत्वनपर भेट घेतलीत का हो? त्यांची कुटुंबे कोणत्या अवस्थेत जगत आहेत, जगणार आहेत याचा कधीतरी विचार केलात का आपण ?
आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आहात म्हणून इतके दिवस तुमचा मानसन्मान ठेवला. परंतु ज्या पोलिसांच्या जीवावर तुम्ही दिवसरात्र जीवाची मुंबई करता आणि त्यांनाच नावे ठेवता , त्यावेळी तुमचा मानसन्मान की काय तो ठेवावा की नाही याचा विचार करावा लागतो. बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या. मागेपुढे पोलीस तुमच्या संरक्षणाला आहेत. याचे भान ठेवा. फुकटच्या संरक्षणात फिरून सुद्धा ही भाषा. बरं नव्ह असलं वागणं .
बाईसाहेब, तुमच्या ह्यांनी म्हणजे देवेंद्रजीनी हो . पाच वर्षे मुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद सुद्धा उपभोगले . पोलीस खात्यासाठी काय केले हो त्यांनी ? पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी काय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या हो त्यांनी ? पाच वर्षे गृहमंत्री असताना पोलिसांसाठी त्यांनी केलेली कोणतीही पाच चांगली कामे सांगावीत. बाईसाहेब , पाच वर्षे म्हणजे फार मोठा कालावधी असतो. परंतु तुमच्या पतीदेवाने या पाच वर्षात गृहखात्यात फतकल मांडून बसल्याशिवाय काहीही केले नाही . ना त्यांनी पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविला , ना त्यांनी पोलिसांच्या विधवा महिलेंचा प्रश्न सोडविला , ना पोलिसांच्या मुलांच्या भविष्यासंबंधी काही प्रश्न सोडविला. काहीही नाही . पती वारल्यानंतर सरकारी घर दोन ते तीन महिन्यात खाली करावे लागते . वाईट परिस्थितीत एखादी विधवा पोलीस महिला आपल्या पतीराजाकडे गेली आणि तिने घरात राहण्यासाठी ५/६ महिन्याची मुदतवाढ मागितली तर ती सुद्धा त्यांना देण्यात आली नाही . सरकारी नियमानुसार काम होईल असे भावनाशून्य उत्तर मिळत असे .
बड्या २/४ आय .पी .एस . अधिकाऱ्यांबरोबर बसून गृहखात्याची पाच वर्षे या व्यक्तीने वाया घालविली . खालच्या , मधल्या श्रेणीतील पोलिसांना त्यांनी कधीच न्याय दिला नाही . आणि आता तुम्ही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करीत आहात? आणि आमच्या सारख्या माजी पोलीस अधिकाऱ्यांनी ते ऐकून गप्प बसावे अशी आपली अपेक्षा आहे की काय? पोलिसांना शिस्तीच्या नावाखाली बोलता येत नाही . त्यांना युनियन करता येत नाही . म्हणून ते बोलू शकत नाहीत. म्हणून कोणीही सोम्यागोम्या उठेल आणि पोलिसांविषयी काहीही बरळेल ? हे सहन होणार नाही.
बाईसाहेब, तुम्हाला जर मुंबईत सुरक्षित वाटतच नसेल तर कशाला राहता मुंबईत ? रहा ना तिकडे उत्तरप्रदेश , बिहार मध्ये . तसेही आपल्या पतीदेवाने पाच वर्षे गुजरात साठी, दोन गुजरात्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्रात राहून काम केले . अगदी तसेच तुम्ही बिहारमध्ये जाऊन त्या सुशांतसिंगच्या घराच्या बाजूला घर घेऊन रहा आणि बिहारचे कल्याण करा .
बाईसाहेब , एक नम्र विनंती . यापुढे एकही वाकडी तिकडी कॉमेंट पोलिसांविषयी टाकू नका. ज्या क्षेत्रातले आपल्याला काही कळत नाही त्यावर आपण कशाला बोलायचे ? आपले सामाजिक योगदान किती ? ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण काहीही बोलू शकतो हा सल्ला आपल्याला दिला कोणी ?? जरा सांभाळून बाईसाहेब .
धन्यवाद !
ऍड . विश्वास काश्यप
माजी पोलीस अधिकारी, मुंबई
कोण आहेत विश्वास काश्यप?
विश्वास काश्यप यांनी २३ वर्ष मुंबई पोलीस दलाची सेवा केली आहे, १९९२ मध्ये MPSC मधून त्यांची पीएसआयपदी नेमणूक झाली होती, त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी सेवेची १५ वर्ष सेवा बाकी असतानाच सेवानिवृत्ती घेतली. सध्या ते पूर्ण वेळ हायकोर्टात वकिली व्यवसाय करतात