लो. टिळक टर्मिनसची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: August 21, 2015 02:03 AM2015-08-21T02:03:57+5:302015-08-21T02:03:57+5:30
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात हायअलर्ट असल्याने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र मुंबईतील प्रमुख टर्मिनसमध्ये समाविष्ट
समीर कर्णुक, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात हायअलर्ट असल्याने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र मुंबईतील प्रमुख टर्मिनसमध्ये समाविष्ट असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसची सुरक्षा सध्या वाऱ्यावर आहे. प्रचंड वर्दळीचे ठिकाण असूनही येथे पोलिसांचा वावरच नाही. स्टेशनमध्ये स्कॅनिंग मशिन उपलब्ध असतानाही प्रवाशांचे सामान तपासण्यासाठी येथे कोणाही पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली नाही. सुरक्षेतील या गंभीर त्रुटींचा फायदा घेत येथे घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे टर्मिनस आहे. या टर्मिनसवरून बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, रांची, कर्नाटक या राज्यात दररोज २५ ते ३० गाड्यांची ये-जा असते. त्यामुळे दिवस-रात्र या टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दोन वर्षांपूर्वी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने करोडो रुपये खर्च करून नवीन इमारत उभी केली. यामध्ये प्रवाशांसाठी वेटिंग रूम, कँटिन आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत दहशतवाद्यांनी रेल्वेला लक्ष्य केल्याने या टर्मिनसवरील सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर मशिन लावण्यात आले. मात्र सध्या या स्कॅनर मशिनवर कोणीच पोलीस कर्मचारी दिसून येत नाही. नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये तीन मुख्य दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजांमधून आत आल्यानंतर मेटल डिटेक्टर आणि मोठमोठ्या ३ स्कॅनिंग मशिन लावण्यात आल्या. मात्र सामान तपासणीसाठी कोणीही पोलीस कर्मचारी नसल्याने प्रवासी बिनधास्तपणे सगळे सामान स्थानकावर घेऊन जातात. कोणताही धाक नसल्याने येथे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.
टर्मिनसवरील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) आणि कुर्ला रेल्वे पोलीस यांच्याकडे आहे. मात्र या दोन्ही यंत्रणांसह रेल्वे प्रशासनाकडूनदेखील या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. टर्मिनसवरील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या परिसरात रोज हजारो प्रवासी तिकिटासाठी रांग लावून उभे असतात. तर अनेक प्रवासी गाडी येण्यास उशीर असल्याने याच ठिकाणी आराम करतात. त्यामुळे नेहमीच या परिसरात प्रवाशांची गर्दी असते. मात्र पोलिसांचे या ठिकाणी दुर्लक्ष असल्याने काही दहशतवादी घुसल्यास मोठी हानी होण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे अनेक हल्ले मुंबईत झाले आहेत. त्यामुळे नेहमीच अलर्ट राहणे गरजेचे आहे. घटना घडल्यानंतर काही दिवस सतर्कता पाळली जाते. मात्र त्यानंतर सुरक्षेबाबत पुन्हा कानाडोळा केला जातो. त्यामुळे पुन्हा एखादा स्फोट अथवा हल्ला होण्याची वाट रेल्वे प्रशासन आणि पोलीस पाहत आहेत का, असा संतप्त सवाल काही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.