Join us

एलएलबीच्या परीक्षा जानेवारी महिन्यात घ्या : महाविद्यालय सुरू होऊन झाले अवघे २० दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:22 AM

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बीबीए एलएलबी पहिल्या वर्षाच्या परीक्षा २० नोव्हेंबरला सुरू होणार आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बीबीए एलएलबी पहिल्या वर्षाच्या परीक्षा २० नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. पण महाविद्यालयातील प्रवेश होऊन अवघे वीसच दिवस पूर्ण होत असताना परीक्षा कशा घेतल्या जाणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असून या परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात याव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे.मुंबई विद्यापीठात मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल आॅनलाइन पद्धतीने लावण्यात आले. आॅनलाइन पद्धतीने निकाल लवकर लागतील, अशी अपेक्षा होती. पण, चित्र उलटे झाले. निकाल लावण्यास विद्यापीठाला लेटमार्क लागला. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमांचे प्रवेशही लांबले. विद्यापीठाच्या नियमानुसार, ९० शैक्षणिक दिवस पूर्ण झाल्यावर परीक्षा घेतात. राज्यभरात सीईटी परीक्षेनंतर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. पण, मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागले. त्यामुळे ही प्रक्रियाही लांबली. या प्रक्रियेतील शेवटचे प्रवेश हे १७ आॅक्टोबरला झाले आहेत. त्यामुळे आता परीक्षा घेणे विद्यापीठाच्या नियमाचे उल्लंघन करणारे आहे.मुबई विद्यापीठाने या विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत. कारण, विद्यार्थ्यांचे लेक्चर झालेलेच नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. तसेच नियमानुसार, ९० दिवस पूर्ण होणेही गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठाने परीक्षा जानेवारी महिन्यात घ्यावी, असे पत्र कुलगुरूंना पाठवण्यात आल्याची माहिती स्टुण्डट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ