हॉक्स कॉल्सच्या नाना तऱ्हा

By admin | Published: January 26, 2016 02:12 AM2016-01-26T02:12:10+5:302016-01-26T02:12:10+5:30

पोलिसांना येणाऱ्या हॉक्स कॉल्सपैकी बहुतेक कॉल्स निव्वळ मजेसाठी किंवा थ्रिल अनुभवण्यासाठी केलेले असतात. काही वेळा बदला घेण्यासाठीही अशा प्रकारचे कॉल्स

Take a look at the calls of the Hawks | हॉक्स कॉल्सच्या नाना तऱ्हा

हॉक्स कॉल्सच्या नाना तऱ्हा

Next

मुंबई : पोलिसांना येणाऱ्या हॉक्स कॉल्सपैकी बहुतेक कॉल्स निव्वळ मजेसाठी किंवा थ्रिल अनुभवण्यासाठी केलेले असतात. काही वेळा बदला घेण्यासाठीही अशा प्रकारचे कॉल्स करण्यात येतात. मुंबई पोलिसांना अशा नाना तऱ्हेच्या कॉल्सना तोंड द्यावे लागते.
२६ जानेवारीला ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ असा मेसेज रेल्वे पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर आला. तपास यंत्रणा कामाला लागली. हा मेसेज मुंबईतल्याच एका महिलेने केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तिच्याकडे चौकशी केली असता, मैत्रिणीने मेसेज फॉरवर्ड केल्याचे तिने सांगितले. मैत्रिणीने अमेरिकेतील नातेवाइकांकडून माहिती मिळाल्याचे सांगितले.
तेथे चौकशी केली, तेव्हा आॅनलाइन बातम्या पाहून अमेरिकेतील नातेवाइकांनी ‘काळजी घ्या’ असा मेसेज पाठविल्याचे स्पष्ट केले. मेसेज चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाला आणि पोलिसांची तारांबळ उडाली.
चिमुरड्याने दिली ताज उडविण्याची धमकी
२९ डिसेंबर २०१५ - ‘मैं पाकिस्तान से बात कर रहा हूँ, ताज हॉटेल में बम धमाका करके हॉटेल उडा दूंगा!’ असा कॉल रेल्वे हेल्पलाइनवर आला. हा कॉल लहान मुलाच्या आवाजात असल्याने रेल्वे पोलिसांसह तपास यंत्रणा चक्रावून गेल्या. ताज हॉटेलची सुरक्षा वाढविण्यात आली. तपासामध्ये हा कॉल डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या ५ वर्षांच्या मुलाने केल्याचे स्पष्ट झाले. मोठ्या बहिणीच्या मोबाइलमध्ये रेल्वे हेल्पलाइनचा नंबर सेव्ह होता. सिनेमा पाहून बहिणीच्या फोनवरून त्या मुलाने हा कॉल केला होता.
सिनेमागृहात बॉम्ब ठेवल्याचा कॉल
१४ नोव्हेंबर २०१५ - कांदिवली येथील सिनेमागृहात बॉम्ब असल्याची बोंब उठवणाऱ्या मोहम्मद राहा मजहार शेखला (२८) गुन्हे शाखेने अटक केली होती. कांदिवली येथील मयूर सिनेमागृहात भोजपुरी सिनेमा पाहत असताना सिनेमातील दृश्याप्रमाणे त्याने दारूच्या नशेत नियंत्रण कक्षाला कॉल केला होता.
‘२६/११’ पेक्षा मोठा हल्ला करणार
२९ सप्टेंबर २०१५ - आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेल उडविण्याची धमकी देणारा एक निनावी फोन मध्यरात्री विमानतळ प्रशासनाला आला. ‘अंधेरीतील एक गट हा हल्ला करणार असून त्यासाठी तीन ठिकाणी पाच-पाच अशी प्रत्येकी पंधरा वाहने वापरली जातील. सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान हे बॉम्बस्फोट होतील. तीव्रता २६/११ हून जास्त असेल’, अशी माहिती त्याने दिल्याने गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली होती.
दहशतवादी हल्ल्याची धमकी
१६ जानेवारी २०१५ - प्रजासत्ताक दिनी मुंबई विमानतळावर दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी विमानतळाच्या शौचालयातील भिंतीवर इसिसच्या नावाने लिहिल्याने खळबळ उडाली. १० जानेवारीलासुद्धा मुंबई विमानतळाच्या शौचालयात एका पोस्टरद्वारे विमानतळ उडविण्याची धमकी आली होती. दरम्यान, तेव्हा पहिल्यांदाच भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी प्रताप
मे २०१४ - प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने परदेशातून फोन करून रोहा-दिवा पॅसेंजर गाडीत बॉम्ब ठेवल्याची अफवा
पसरवली होती. श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथक अलिबाग, पनवेलहून विशेष गाडीने मागवण्यात आले. तब्बल चार तास तपासणी झाली. तथापि, हाती मात्र काहीच लागले नाही. गाडी रद्द करण्यात आली. विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून हे घडल्याचे समोर आले
होते.

Web Title: Take a look at the calls of the Hawks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.