क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्या, सिनेट सदस्यांची विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 09:31 PM2019-04-02T21:31:01+5:302019-04-02T21:31:12+5:30
मुंबई: मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत असतात. तसेच अनेक विद्यार्थी एनसीसी, एनएसएसच्याही अनेक उपक्रमांत सहभागी ...
मुंबई: मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत असतात. तसेच अनेक विद्यार्थी एनसीसी, एनएसएसच्याही अनेक उपक्रमांत सहभागी होत असतात. मात्र या उपक्रम आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने अशा सर्व विद्यार्थ्याची फेरपरीक्षा घेण्याची व्यवस्था करावी अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात मंगळवारी युवासेनेच्या शिष्टमंडळाने कुलसचिव अजय देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. मुंबई विद्यापीठ कला, क्रीडा, सांस्कृतिक, तसेच इतर उपक्रमाच्या तारखा आणि परीक्षांच्या तारखा अनेकदा एकाच वेळी येत असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव एकाचीच निवड करावी लागते. परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धाना तर स्पर्धेत उतरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागणार असल्याने त्यांना भीती असते. परिणामी त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असते, सदर विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर पूर्वी घेत असत परंतु नवीन नियमाप्रमाणे घेता येत नाही तरी विद्यापीठाने या नियमात बदल करुन परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केली आहे.
शैक्षणिक नुकसान होणार या भीतीने क्रीडा , सांस्कृतिक स्पर्धाना अर्धी टीमच उतरवली जाते आणि मग ती आपला उत्तम प्रभाव मैदानात किंवा त्या स्पर्धेत देत नाही. हे एकूण विद्यापीठाचेच नुकसान आहे. खरंतर कायद्यानुसार खेळाडू विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणं विद्यापीठाला बंधनकारक आहे. मात्र विद्यापीठाकडून ठोस निर्देश नसल्याने आणि विद्यार्थ्याना याबाबतची माहिती नसल्याने विद्यार्थी मागे राहत असल्याची माहिती प्रदीप सावंत यांनी दिली. यासंदर्भात हा विषय आपण लवकरच अकॅडेमिक कौन्सिलमध्ये मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.