मुंबई : दादर पूर्व येथील शारदा मेन्शनलगत असलेल्या माधवदास पास्ता मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत परिवहन विभागाने तत्काळ वेळीच योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मुळात हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यात दोन्ही बाजूंनी वाहनांची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे एका वेळी एकच वाहन ये-जा करू शकते, अशी परिस्थिती आहे. फूटपाथदेखील नसल्यामुळे नागरिकांना वाहनांचा अडथळा होतो. वाहनचालकांनाही नागरिकांचा अडथळा होतो, अशी परिस्थिती आहे. वास्तविक माधवदास पास्ता रोड हा एरव्ही गजबजलेला असतो. कोरोना काळात या ठिकाणी परिस्थिती वेगळी होती.
त्यामुळे वाहतूक पोलिसांनी जर या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला सम दिवशी आणि दुसऱ्या बाजूला विषम दिवशी पार्किंग करण्यासारखे पर्याय स्वीकारले तर नक्कीच या ठिकाणी नागरिकांना तसेच वाहनचालकांनादेखील होणारा त्रास दूर होऊ शकतो. हा पर्याय स्वीकारला तर नक्कीच सुवर्णमध्य साधला जाईल.
याबाबत अनेकदा नागरिकांकडून मागणी होऊनही परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे याकडे लक्ष देणे शक्य झाले नसावे. परंतु आता त्यांनी वेळीच योग्य ती उपाययोजना करून नागरिकांना आणि वाहनमालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दक्ष नागरिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.